नवी दिल्ली : सरकारने सोन्याच्या दागिन्यांसाठी हॉलमार्क अनिवार्य केले आहे. 1 जून 2021 पासून हॉलमार्क नसलेल्या सोन्याची विक्री करता येणार नाही. ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड म्हणजेच बीआयएसने अधिसूचना जारी करत सर्व सराफांना याची माहिती दिली आहे. सोन्याची शुद्धता आता तीन दर्जांमध्ये असेल. पहिले 22 कॅरेट, दुसरे 18 कॅरेट आणि तिसरे 14 कॅरेट.असे मानले जात आहे की, यामुळे ग्राहक आणि विक्रेते दोघांचाही फायदा होईल. दर्जाबद्दल या दोघांच्याही मनात शंका राहणार नाही.
सोन्यासाठी हॉलमार्किंग ही त्याच्या शुद्धतेची ओळख आहे, पण सध्या हॉलमार्क अनिवार्य नाही. याआधी याची शेवटची तारीख 15 जानेवारी 2021 होती. सराफ संघटनेच्या मागणीवरून ही वाढवून 1 जून 2021 केली गेली. भारत खूप मोठ्या प्रमाणावर सोने आयात करतो आणि वापरही करतो. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार भारत दरवर्षी साधारण 700-800 टन सोन्याची आयात करतो. दागिन्यांचे हॉलमार्किंग करण्याच्या प्रक्रियेत सराफ बीआयएसच्या ए अँड एच केंद्रावर दागिने जमा करतात आणि तिथे त्यांच्या गुणवत्तेची तपासणी केली जाते. परिणामांनुसार बीआयएस त्या दागिन्यांवर मार्किंग करते.
सराफांसाठी बीआयएसमध्ये नोंदणी करण्याची प्रक्रिया बरीच सोपी करण्यात आली आहे. आता हे काम घर बसल्या ऑनलाईनही होऊ शकते. यासाठी आपल्याला www.manakonline.in या संकेतस्थळावर जायचे आहे. इथे आपली सर्व कागदपत्रे मागितली जातात आणि ती जमा केल्यानंतर नोंदणीशुल्क भरून घेतले जाते. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अर्जदार हा बीआयएसचा नोंदणीकृत सराफ बनतो.
बीआएसचे नोंदणीचे शुल्क बरेच कमी आहे. जर एका सराफाची उलाढाल 5 कोटीपेक्षा कमी असेल तर त्याच्यासाठी हे शुल्क 7500 रुपये, 5 कोटी ते 25 कोटीदरम्यान वार्षिक उलाढाल असल्यास 15 हजार रुपये आणि 25 कोटींपेक्षा जास्त उलाढाल असल्यास हे शुल्क 40 हजार रुपये आहे. जर एखाद्या सराफाची उलाढाल 100 कोटींपेक्षा जास्त असेल तर त्याच्यासाठी हे शुल्क 80 हजार रुपये आहे.