परभणीः परभणीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबाजानी दुर्राणी यांनी आल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांच्या राजीनाम्यामुळे पक्षाला मोठा धक्का बसला आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे रायगड जिल्हाध्यक्ष आणि माजी आमदार सुरेळ लाड यांनी राजीनामा दिला होता त्यानंतर दुर्राणी यांचा राजीनामा पक्षासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
आमदार बाबाजानी दुर्राणी यांना 18 नोव्हेंबर रोजी मारहाण झाल्याची घटना घडली होती. त्यामुळे ते चांगलेच चर्चेत आले होते. दुर्राणी हे पाथरीतील कबरस्थान परिसरात समर्थकांसह उभे होते. यावेळी शहरातील मोहम्मद सईद या इसमाने दुर्रानी यांच्यासोबत वाद घालत त्यांच्या श्रीमुखात भडकावली होती. याप्रकरणी दुर्राणी यांच्या तक्रारीनंतर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेमुळे शहरात तणाव निर्माण झाला होता. व्यापाऱ्यांनी पाथरी बंदची हाक दिली. त्यानंतर आता दुर्रानी यांनी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे.
आमदार दुर्राणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदावर होते. मात्र, पाथरी येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटी थकबाकीदार असल्याच्या कारणावरून त्यांचे जिल्हा बँकेचे संचालक पद रद्द करण्याबाबत आदेश मागील सरकारने काढले होते. विशेष म्हणजे हे संचालक पद कायम ठेवण्याचे आदेश या सरकारने काही दिवसांपूर्वीच काढले होते. त्यांच्यावर कोणताही संबंध नसताना चुकीचे कारण दाखवून संचालकपद रद्द केल्याचा आरोप झाला होता.