सांगली : सांगलीच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. या ठिकाणी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार रोहित पाटील यांना राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं पाठिंबा जाहीर केला आहे. एवढंच नाही तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून रोहित पाटील यांचा प्रचार देखील करण्यात येणार आहे.
रोहित पाटील हे राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून सांगलीच्या तासगाव-कवठेमहांकाळ विधासभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत, तर त्यांच्याविरोधात राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून माजी खासदार संजय पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सांगली जिल्हा अध्यक्ष महेश खराडे यांनी हा पाठिंबा जाहीर केला आहे.
अजित पवारांना मोठा धक्का
दरम्यान या विधानसभा मतदारसंघात दोनही राष्ट्रवादीचेच उमेदवार आहेत. राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून रोहित पाटील तर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून संजय पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून रोहित पाटील यांना पाठिंबा देण्यात आल्यामुळे या मतदारसंघात रोहित पाटील यांची ताकद वाढली आहे.
23 उमेदवार रिंगणात
या मतदारसंघातून एकूण 23 उमेदवार रिंगणात आहेत, त्यापैकी दहा उमेदवारांनी विविध पक्षांच्या वतीनं अर्ज दाखल केला आहे तर तेरा उमेदवार हे अपक्ष निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे या मतदारसंघाकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.