लहानांचा मोठयांना ‘धप्पा’

अभिव्यक्ती स्वातंत्र्य, सहिष्णुता असे शब्द मागील काही दिवसांपासून वेगवेगळ्या कारणांनी आपल्या कानावर सातत्याने आदळत आहेत. गिरीश कुलकर्णी लिखित आणि निपुण धर्माधिकारी दिग्दर्शित ‘धप्पा’ हा चित्रपट याच विषयावर भाष्य करणारा आहे. या चित्रपटाला राष्ट्रीय एकात्मता या विषयासंबंधीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे.

‘धप्पा’ चित्रपटाची कथा एका सोसायटीत गणेशोत्सवानिमित्त होणाऱ्या लहान मुलांच्या नाटकाभोवती गुंफण्यात आली आहे. या सोसायटीतील लहान मुलांसाठी अनुराधा देवधर (वृषाली कुलकर्णी ) या एक नाटक बसवत असतात. ‘झाडे पळाली’ या नाटकाच्या माध्यमातून मुलांना पर्यावरणाची जाणीव करून देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.  या नाटकात परी, संत तुकाराम, येशु ख्रिस्त यांचा समावेश असतो. मात्र या नाटकात येशू यांच्या पात्राचा समावेश असल्याचे समजल्यावर एका राजकीय नेत्याचे कार्यकर्ते मुलांचा सराव सुरू असतो, त्या ठिकाणी जाऊन नासधूस करतात, रहिवाशांना धमकावतात, सुरक्षा रक्षकाला मारहाण करतात. तसेच गणेशोत्सवात फक्त गणपतीच असायला हवा, येशू ख्रिस्त येता कामा नये, अशी धम असे बजावून जाजाता.  या सर्व प्रकारानंतर सोसायटीतील रहिवाशी शांतता भंग होऊ नये, यासाठी हे नाटक सादर करायचे नाही असा निर्णय घेतात. परंतु ही लहान मुले पालकांच्या नकळत हे नाटक गणेशोत्सवात करण्याचा निर्णय घेतात आणि ‘मिशन झॅप झॅप’ आखतात. पुढे ही मुले आपल्या निर्णयावर ठाम राहू शकतात का? पालक काय भूमिका घेतात? हे जाणून घेण्यासाठी ‘धप्पा’ बघायला हवा.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘‘तुला माहीत आहे ना बाहेरचं जग कसं आहे?’’ या प्रश्नावर ‘’बाहेरच्या जगाला सामोरे जाण्याचा तो प्रयत्न करतोय, त्याला दुबळं नको बनवू.’’ असा संवाद कोणत्याही पालकांमध्ये आज होत नाही. उलट आपल्या मुलांनी चार भिंतीत राहावे असे पालकांना वाटते. मात्र निपुण धर्माधिकारी दिग्दर्शित ‘धप्पा’ या मराठी चित्रपटातील हा संवाद काही तरी वेगळे सांगू पाहत आहे. मुलांच्या नजरेतून दिसणारं मोठ्यांचं जग, त्यांना पडणारे प्रश्न, त्यांची मस्ती, धमाल आणि मनात जपलेली संवदेनशीलता या सगळ्याचा प्रत्यय धप्पा पाहताना येतो.  चित्रपटाचा विषय गंभीर असला तरी लेखक गिरीश कुलकर्णी यांनी आपल्या लेखणीतून लहान मुलांच्या नजरेतूनच बघितले आहे यामुळे चित्रपट अधिक भावतो.

कलाकारांच्या अभिनयाबद्दल सांगायचे तर सर्वच बालकलाकारांनी धमाल केली आहे. शारवी कुलकर्णी, आकाश कांबळे, अक्षय यादव यांच्याशसह इतर मुलांनी चान काम केले आहे. मुलांच्या हलक्या फुलक्या अभिनयाने चित्रपटात रंगत आली आहे. वृषाली कुलकर्णी, इरावती हर्षे, सुनिल बर्वे, गिरीश कुलकर्णी, श्रीकांत यादव, उमेश जगताप या कलाकारांनी आपले काम योग्य रीतीने पार पाडले आहे.

चित्रपटाला गंधार यांनी संगीत दिले आहे. ‘बंडाचा झेंडा’ आणि ‘xxl बंडी’ ही दोन्ही गाणी चांगली झाली आहेत. एकंदरीत सांगायचे तर लहान मुलांनी त्यांच्या परीने प्रस्थापितांना दिलेला ‘धप्पा’ एकदा पाहायला हरकत नाही.

चित्रपट – धप्पा

निर्मिती – विशबेरी फिल्मस् , इंक टेल्स आणि अरभाट फिल्म्स

दिग्दर्शक – निपुण धर्माधिकारी

संगीत – गांधार

कलाकार – वृषाली कुलकर्णी, इरावती हर्षे, श्रीकांत यादव, गिरीश कुलकर्णी, चंद्रकांत काळे, ज्योती सुभाष, उमेश जगताप, आकाश कांबळे, शारवी कुलकर्णी, अक्षय यादव, शर्व वढवेकर, श्रीहरी अभ्यंकर ,दीपाली बोरकर, अभिजीत शिंदे, नील देशपांडे

रेटिंग – ३.५

भूपाल पंडित

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)