बिग बॅंग संकल्पना बदलावी लागणार – डॉ. जयंत नारळीकर

पुणे, दि. 26 – “वैज्ञानिक दृष्टीकोनाची किती गरज आहे, याची जाणीव मला या क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केल्यावर जाणवली. वैज्ञानिक दृष्टिकोन रूजविण्यासाठी तरुणांना काम करण्यास खूप वाव आहे,’ असे मत डॉ. जयंत नारळीकर यांनी व्यक्त केले.

वक्तृत्वोत्तेजक सभेसह न्यायमूर्ती रानडे यांनी स्थापन केलेल्या संस्थांच्या वतीने आयोजित वसंत व्याख्यानमालेत डॉ. नारळीकर “विश्‍वाच्या उत्पत्तीविषयी काही विचार’ या विषयावर बोलत होते. यावेळी डॉ. नारळीकर यांना दुसरा न्या. रानडे स्मृती पुरस्कार डॉ. दीपक टिळक यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी ग्रंथोत्तेजक सभेचे डॉ. अविनाश चापेकर, पुणे प्रार्थना सभेचे डॉ. दिलीप जोग आदी उपस्थित होते.

“विश्‍वाच्या उत्पत्तीविषयी विज्ञानात अनेक मत प्रवाह आहेत. बिग बॅंगपासून विश्‍व अस्तित्वात आल्याची संकल्पना मांडण्यात आली आहे. मात्र या संकल्पनेबाबत अनेक प्रश्‍न आहेत. त्या सर्वांची उत्तरे आपल्याला मिळविता आली पाहिजेत. महास्फोट कशामुळे झाला, त्यातून काय बाहेर आले याचे उत्तरच आपल्याकडे नाही. त्यामुळे जिथे उत्तरे मिळत नाहीत, तिथे भौतिक विज्ञान लागू होत नाही. म्हणूनच येत्या काळात आपल्याला बिग बॅंग ही संकल्पना बदलावी लागणार आहे,’ असे नारळीकर यांनी सांगितले आहे.

पृथ्वीप्रमाणेच इतर ग्रहावर जीवसृष्टी अस्तित्वात आहे का? याबाबत संशोधन सुरू आहे. कोठे जीवसृष्टी असेल, तर ते आपल्यापेक्षा पुढे असतील. त्यासाठी दोन प्रकारे पुरावे मिळविण्याचा प्रयत्न सुरू आहे. रेडिओ सिग्नल पाठविले जात आहेत. हे सिग्नल विज्ञान आणि गणितीय भाषेत पाठविले जात आहेत. त्यास प्रति उत्तर मिळाल्यास इतर ग्रहावर जीवसृष्टी असल्याचे सिद्ध होईल. तसेच दुसरा प्रयत्न म्हणजे पृथ्वीपासून 41 कि.मी. उंचीवर व्हायरस तपासले आहे. तेथे परग्रहावरील व्हायरस आढळल्यास जीवसृष्टीचा शोध घेता येणार असल्याचेही डॉ. नारळीकर यांनी स्पष्ट केले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.