अमिताभ बच्चन दर रविवारी आपल्या जलसा बंगल्याबाहेर येऊन आपल्या चाहत्यांना दर्शन देत असतात. गेल्या कित्येक वर्षात त्यांचा हा रिवाज चुकलेला नाही. मात्र गेल्या रविवारी ते बंगल्याबाहेर येऊ शकले नाहीत. त्यातच त्याच दिवशी त्यांचा वाढदिवसही होता. त्यामुळे सहाजिकच त्यांना शुभेच्छा देण्यासाठी जमा होणाऱ्या फॅन्सची संख्याही नेहमीपेक्षा अधिकच होती.
मात्र बच्चन यांना अलीकडेच करोनाचा संसर्ग होऊन गेला आहे. काही दिवस त्यांना रुग्णालयातही काढावे लागले आहेत. त्यामुळे सहाजिकाच गर्दीपासून दूर राहण्याच्या सूचनेचे पालन करण्यासाठी त्यांनी या रविवारी फॅन्सच्या भेटीसाठी बंगल्याबाहेर न येण्याचा निर्णय घेतला.
मात्र याबद्दल एक ब्लॉग लिहून बच्चन यांनी आपल्या चाहत्यांची माफी मागितली आहे. जे चाहते जलसाबाहेर जमा झाले होते आणि ज्यांना रस्त्यावरच ताटकळत उभे रहावे लागले, त्यांची मी मनापासून माफी मागतो. कारण मला घराबाहेर पडण्याची परवानगी नाही.
काळजी घेणे अनिवार्य आहे. त्यामुळे मला माफ करा, असे बच्चन यांनी आपल्या ब्लॉगमध्ये म्हटले आहे. यापूर्वीही मार्चमध्ये कोविड-19 ची साथ वेगाने वाढायला सुरुवात झाल्यावर बच्चन यांनी “संडे दर्शन’ काही काळासाठी स्थगित केले होते. आपल्या चाहत्यांनी भेटण्यासाठी रविवारी जलसाबाहेर येऊ नये. स्वतःची काळजी घ्यावी, असे त्यांनी त्यावेळीही म्हटले होते.