मुंबई – कन्नड चित्रपट अभिनेता ‘पुनीत राजकुमार’चे वयाच्या 46व्या वर्षी जिममध्ये व्यायाम करताना हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण कर्नाटकात शोककळा पसरली होती. पुनीतला जावून अनेक दिवस उलटले असले तरी त्याच्या चाहत्यांची त्यासाठी असलेली ओढ कणभरही कमी झाली नाही.
अश्यातच आता पुनीत यांच्या निधनाच्या तीन महिन्यानंतर अँमेझॉन प्राइमने एक मोठी घोषणा केली आहे. या संदर्भातील एक पोस्ट सुद्धा अँमेझॉन प्राइमने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केली आहे.
येत्या फेब्रुवारी महिन्यात पुनीत राजकुमार यांचे पाच प्रसिद्ध चित्रपट अॅमेझॉन प्राइमवर अगदी मोफत दाखवले जातील असे जाहीर केले. विशेष म्हणजे अॅमेझॉनची प्राइम सबस्क्रीप्शन नसलेल्यांनाही या चित्रपटांचा आनंद घेता येणार आहे.
‘लॉ’, ‘फ्रेंच बिरयानी’, ‘कवलुदारी’, ‘मायाबाजार’ आणि ‘युवारत्न’ हे पाच सुपरहिट चित्रपट दाखविले जाणार आहे. पुनीत राजकुमार यांचे हे पाच चित्रपट 2019 ते 2021 दरम्यान प्रदर्शित झाले असून, हे चित्रपट अतिशय सुपरहिट ठरले होते. पुनीतने आपल्या करिअरची सुरुवात बालकलाकार म्हणून केली होती, त्याला राष्ट्रीय पुरस्कारानेही गौरविण्यात आले होते.