नाशिक : पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या फरार दोन गांजा तस्करांना नाशिक शहर पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. संशयित आरोपी रेकॉर्डवरील असून त्यांच्याविरूध्द भंडारा व निफाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. भंडारा पोलिसांनी १६७.१०० किलो ग्रॅम वजनाचा २५ लाख ६ हजार ५०० रुपयांचा गांजा जप्त केला असून, गुन्हा दाखल केला आहे.
या गुन्ह्यात दोघे जण फरार झाले होते. तुषार संतोष भोसले (वय २६, रा. गोपालनगर, अमृतधाम, नाशिक), सूरज रामू शिंदे (२७, रा. ध्रुवनगर, महाराणा प्रताप गार्डन, गंगापूर रोड, नाशिक) अशी अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस अंमलदार बाळासाहेब नांद्रे यांना शुक्रवारी (दि.६) गांजा तस्करी करणारे दोघे नाशिकमधून पळून जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली.
या दोघांवर भंडारा पोलीस ठाण्यात नाशिकमधील दोघांवर गांजाप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून पोलिसांनी पासपोर्ट व गुन्हयात वापरलेल्या चारचाकी वाहन ताब्यात घेतले. पोलिसांनी पुढील कारवाईसाठी दोघांना भंडारा पोलीस ठाण्यातील पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.