नवी दिल्ली – राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमवर २५ लाखांचे बक्षीस जाहीर केले आहे. तपास यंत्रणेने दाऊदच्या गुंडांवर बक्षीसही दिलं जाणार असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे..
मिळालेल्या माहितीनुसार, एनआयएने या वर्षी ३ फेब्रुवारीला एफआयआर नोंदवला होता. यामध्ये दाऊद इब्राहिम, छोटा शकील, अनीस इब्राहिम, जावेद चिकना आणि टायगर मेमन यांच्यावर शस्त्रास्त्रांची तस्करी, नार्को दहशतवाद, अंडरवर्ल्ड क्रिमिनल सिंडिकेट, मनी लाँड्रिंग याशिवाय चुकीच्या पद्धतीने जमीन बळकावण्याचे आरोप आहेत.
दाऊदच्या गुंडांवर बक्षीस
याशिवाय जैश आणि अल कायदासारख्या दहशतवादी संघटनांशी संबंधित असल्याचाही एफआयआरमध्ये उल्लेख आहे. आता याप्रकरणी एनआयएने या सर्व कुख्यात दहशतवाद्यांवर बक्षीस जाहीर केले आहे. दाऊद इब्राहिमवर 25 लाख, छोटा शकीलवर 20 लाख, तर अनीस इब्राहिम, जावेद चिकना आणि टायगर मेमनवर प्रत्येकी 15 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.
कराचीत आहे दाऊदचा तळ
दाऊद इब्राहिमने पाकिस्तानातील कराचीला आपले तळ बनवले आहे. 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटांव्यतिरिक्त भारतातील अनेक दहशतवादी कारवायांमध्ये दाऊदचा हात आहे. 2003 मध्ये, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने त्याच्यावर $25 दशलक्ष बक्षीस जाहीर केले. हाफिज सईद, मौलाना मसूद अझहर, सय्यद सलाहुद्दीन, अब्दुल रऊफ असगर यांच्यासह दाऊद हा भारतातील मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांपैकी एक आहे.
एनआयएची कारवाई सुरू
मे महिन्यात एनआयएने डी कंपनीच्या दोन साथीदारांना मुंबईतून अटक केली होती. अटक केलेल्या दोन्ही आरोपींचा मुंबईच्या पश्चिम उपनगरात डी-कंपनीला बेकायदेशीर कारवाई आणि दहशतवादी वित्तपुरवठा करण्यात गुंतल्याचे तपासात उघड झाले आहे. याशिवाय, तो शकील शेख उर्फ छोटा शकीलचा जवळचा सहकारी आहे, जो पाकिस्तानमधून आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी सिंडिकेट चालवतो आणि भारतात खंडणी, अंमली पदार्थांची तस्करी आणि हिंसक दहशतवादी कारवायांमध्ये सामील आहे.
मे महिन्यातच एनआयएने मुंबईतील दाऊद इब्राहिमचे सहकारी, ड्रग्ज पेडलर आणि हवाला ऑपरेटरशी संबंधित डझनभर ठिकाणांवर छापे टाकले होते. NIA च्या पथकांनी नागपाडा, भेंडी बाजार, माझगाव, परळ, माहीम, सांताक्रूझ, कुर्ला, गोरेगाव, बोरिवली, मुंब्रा (ठाणे) आणि मुंबई आणि ठाण्यातील इतर ठिकाणी एकत्रितपणे छापे टाकले.