सॅन फ्रॅन्सिस्को : अमेरिकेच्या संसद भवनात झालेल्या अभूतपूर्व अशा हिंसक आदोलनाचे पडसाद जागतिक स्तरावर पडल्याचे दिसत आहे. त्यामुळे आता अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अडचणीत भर पडताना दिसत आहे. घटनेप्रकरणी आता त्यांच्या सोशल मीडिया वापरावरही निर्बंध आणण्यात आले आहेत. फेसबुक आणि इन्स्टाग्राममागोमाग आता ट्रम्प यांच्या ट्विटर अकाऊंटवरही कायमस्वरुपी बंदी घालण्यात आली आहे.
Twitter permanently suspends Trump's account over 'risk of further incitement of violence'
Read @ANI Story | https://t.co/OlsAOlEvaH pic.twitter.com/SmBrOh921Q
— ANI Digital (@ani_digital) January 8, 2021
युएस कॅपिटलवर ट्रम्प समर्थकांकडून करण्यात आलेल्या गोंधळ आणि त्यानंतर झालेल्या हिंसक घटनेमुळे अशा प्रकारची कोणतीही घटना भविष्यात घडू नये, यासाठी पुढील काळाबाबतची सावधगिरी म्हणून त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर बंदीची कारवाई करण्यात आली आहे. शुक्रवारी ट्विटरकडून हा निर्णय़ घेण्यात आला. ‘@realDonaldTrump’ या ट्विटर अकाऊंटवरील ट्विटचं जवळून निरीक्षण केल्यानंतरच हा निर्णय घेण्यात आल्याचे ट्विटरकरडून ब्लॉग पोस्टमध्ये सांगण्यात आले. यावेळी भविष्यात भडकावू ट्विटमुळे अशा प्रकारची कोणतीही हिंसक घटना घडू नये, यासाठीच हा निर्णय घेण्यात आला असल्याचे कारण देण्यात आले.
युएस कॅपिटलम्ये झालेल्या निराशाजनक घटनेनंतर लगेचच प्राथमिक स्वरुपात 12 तासांसाठी ट्रम्प याचे ट्विटर अकाऊंट निलंबित केले होते. शिवाय भडकावू ट्विट करण्याचे सत्र असंच सुरु राहिल्यास अकाऊंवर कायमस्वरूपी बंदीची कारवाई केली जाऊ शकते, अशी ताकिदही त्यांना ट्विटरकडून देण्यात आली होती. अखेरच याचीच अंमलबजावणी आता करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, ट्विटर अकाऊंट कायमस्वरुपी निलंबित करण्यात आल्याची ही मोठी कारवाई ट्रम्प यांच्यावर करण्यात आल्यामुळे आता यापुढे ते नेमकी काय प्रतिक्रिया देणार हे पाहणे गरजेचे आहे.