पाटणा – पाटण्यातील दानापूर परिसरात मंगळवारी सकाळी भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांच्या वाहनावर एक भरधाव ट्रकची धडक होऊन हा ट्रक उलटल्याने हा अपघात झाला आहे. धडक बसल्यानंतर भीषण स्फोट होऊन यामध्ये तीन पोलिसांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर दोन पोलिस गंभीर जखमी झाले आहेत.
घटनास्थळी उपस्थित लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रकने पोलिस जिप्सीला मागून धडक दिली. त्यानंतर ट्रक जिप्सीवर पलटी झाला. ट्रक धडकल्याने त्यावेळी वाहनाचा स्फोट झाला यामध्ये जिप्सीमधील पाच पोलीस त्यात गाडले गेले. त्यापैकी तीन पोलिसांचा जागीच होरपळून मृत्यू झाला असून दोन पोलिस गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांच्या जिप्सीलाही आग लागल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि आग विझवली.
ही जिप्सी पाटणातील गार्डनीबाग पोलिस स्टेशनची असल्याचे माहितीमध्ये सांगण्यात आले आहे. या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून वाहनाखाली अडकलेल्या पोलिसांना बाहेर काढले. गंभीर अवस्थेत असेलेल्या पोलिसांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. तीन पोलिसांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. वरिष्ठ अधिकारीही घटनास्थळी पोहोचले. या घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.