पुणे, दि. 2 – चालकाचे नियंत्रण सुटल्याने खडकवासला धरणात मोटार पडून आईसह तीन मुलींचा दुर्देवी मृत्यू झाला. तर मुलीचे वडील मात्र बचावले आहेत. या सर्वांचे मृतदेह पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणच्या अग्नीशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी रात्री आठच्या सुमारास बाहेर काढले. रात्री उशीरापर्यंत या प्रकरणी वेल्हा पोलिसांकडे गुन्हा नोंदवण्याचे काम सुरू होते.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विठ्ठल केशव भिकुले (वय 46, सध्या रा. चव्हाणनगर, धनकवडी; मुळ रा. विहिर ता. वेल्हे)हे आपल्या गावातून पुण्याकडे कुटुंबासह परतत होते. त्यावेळी कुरण फाट्याजवळ वाहनावरील भिकुले यांचे नियंत्रण सुटले.
ही मोटार थेट खडकवासल्याच्या पाणलोटात शिरली. ही बाब पाहणाऱ्यांनी आरडा ओरडा करत मदतीसाठी धाव गेतली. त्यानंतर विठ्ठल भिकुले हे पोहत बाहेर आले. ग्रामस्थांनी दोन मुलींचे मृतदेह बाहेर काढले. तर तिसरी मुलगी आणि त्यांच्या आईचा मृतदेह अग्नीशामक दलाने बाहेर काढले. त्यानंतर गाडीही पाण्याबाहेर काढण्यात आली.
विठ्ठल यांची पत्नी अल्पना (वय 45), मुलगी प्राजक्ता (वय 21), प्रणिता (वय 17), वैदेही (वय आठ) यांचा मृत्यू झाला. मदत कार्याची ही मोहीम मुख्य अग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आल्याचे सुजित पाटील यांनी सांगितले.