वॉशिंग्टन – अमेरिकेचे नियोजित अध्यक्ष ज्यो बायडेन यांच्या सहकारी आणि भावी उपाध्यक्षा म्हणून कमला हॅरिस या भारतीय वंशाच्या महिलेची वर्णी लागली आहे. आता या भावी मंत्रिमंडळात भारतीय वंशाच्या आणखी दोघांची वर्णी लागली आहे.
कोविड-19 प्रतिबंधासाठी व्हाइट हाउसच्या सल्लागार मंडळाच्या नियोजित अध्यक्षपदी भारतीय वंशाचे डॉ. विवेक मूर्ती यांना निवडण्यात आले आहे. या सल्लागार मंडळावर डॉ. अतुल गावंडे यांनाही निवडण्यात आले आहे.
ज्यो बायडेन आणि कमला हॅरिस यांचा अमेरिकेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदी 20 जानेवारीला शपथविधी होणार आहे. त्यांच्या भावी मंत्रिमंडळामध्ये आणखीही काही भारतीय वंशाचे उच्चपदस्थ असणार आहेत. त्यामध्ये अरुण मुजुमदार आणि किरण आहुजा यांचाही समावेश असेल. मुजुमदार हे स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीतील प्रिकाउंट इन्स्टिट्युट ऑफ एनर्जीचे संचालक आहेत.
आण्विक शस्त्रांचे डिझाइन, उत्पादन आणि चाचणी करणाऱ्या उर्जा विभागाशी काम करणाऱ्या संघाचे ते प्रमुख असणार आहेत. त्यांच्या संचात कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या भौतिक विज्ञान प्राध्यापक राममूर्ती रमेश यांचा समावेश आहे. तर आहुजा हे नागरी हक्क विषयक कायदेतज्ञ आहेत. त्यांनी यापूर्वी बराक ओबामा यांच्या अध्यक्षपदाच्या काळात ऑफिस ऑफ पर्सनल मॅनेजमेंटचे चीफ ऑफ स्टाफ, आशियाई अमेरिकन लोकांबाबत आणि पॅसिफिक बेटांबाबत व्हाइट हाउसच्या पुढाकाराचे कार्यकारी संचालक म्हणून जबाबदारी सांभाळली आहे.
याशिवाय सुमोना गुहा, पुनीत तलवार, दिलप्रित सिधू, पवनीत सिंग, अरुण वेंकटरमण, प्रविणा राघवन, आशा जॉर्ज, सुभश्री रामनाथन, भाव्य लाल आदी भारतीय वंशाच्या विविध क्षेत्रांमधील तज्ञांना विविध उच्च पदांसाठी निवडण्यात आले आहे.