नवी दिल्ली, दि. 14 -अमेरिकेच्या अध्यक्षपदी ज्यो बायडेन यांची निवड झाल्याबद्दल माहिती तंत्रज्ञान उद्योगाने स्वागत केले आहे.भारतातील माहिती तंत्रज्ञान उद्योग अमेरिकेतील उद्योगाबरोबर बऱ्याच काळापासून काम करीत आहे. मात्र, डोनाल्ड ट्रम्प यांच्या कारकिर्दीमध्ये भारतातील माहिती तंत्रज्ञान उद्योगावर बरेच निर्बंध घालण्यात आले होते. याचा भारतातील कंपन्यांबरोबरचा अमेरिकेतील कंपन्यांनीही विरोध केला होता. मात्र, त्याकडे ट्रम्प प्रशासनाने दुर्लक्ष केले होते.
बायडेन यांच्या कालावधीत भारतातील माहिती तंत्रज्ञान उद्योग अमेरिकेतील उद्योगाबरोबर अधिक व्यापक काम करू शकेल, असे माहिती तंत्रज्ञान कंपन्यांची संघटना असलेल्या नॅसकॉमने म्हटले आहे. भारतातील माहिती तंत्रज्ञान उद्योगात 43 लाख 60 हजार कामगार काम करतात.
यावर्षी या क्षेत्राचा महसूल 7.7 टक्क्यांनी वाढून 191 अब्ज डॉलर होईल, अशी अपेक्षा आहे. आता अमेरिकेतील बदललेल्या परिस्थितीमुळे या उद्दिष्टात वाढ होण्याची शक्यता आहे.
भारतातील माहिती तंत्रज्ञान कंपन्या अमेरिकेतील कंपन्यांना सॉफ्टवेअरचा पुरवठा करतात. मात्र देखभालीसाठी आणि इतर महत्त्वाच्या कामासाठी भारतातील काही कर्मचारी अमेरिकेत जाणे आवश्यक असते. एच1-बीच्या माध्यमातून हे कर्मचारी अमेरिकेत जातात. मात्र, या विषयावर ट्रम्प प्रशासनाने मर्यादा आणल्यामुळे भारतातील माहिती तंत्रज्ञान कंपन्यांवर परिणाम होत होता. आता ही परिस्थिती सुधारेल असे नॅसकॉमने म्हटले आहे.