बायडेन यांची धोरणे रोजगार आणि देशविरोधी – डोनाल्ड ट्रम्प

2024 ची अध्यक्षीय निवडणूक लढवण्याचे सूतोवाच

वॉशिंग्टन – अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांची धोरणे रोजगार विरोधी आणि विज्ञानविरोधी आहेत. त्यांच्या धोरणांमुळे अमेरिकेचे नुकसानच होते आहे. “अमेरिका फर्स्ट’ पासून “अमेरिका लास्ट’ पर्यंतचा प्रवास गेल्या महिन्याभरातच सुरू झाला आहे, अशी टीका माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे.

फ्लोरिडामध्ये ओरलॅन्डो येथे “कन्झर्व्हेटिव्ह पॉलिटिकल ऍक्‍शन कमिटी’च्या वार्षिक परिषदेमध्ये बोलताना ट्रम्प यांनी 2024 ची अध्यक्षीय निवडणूक आपण लढवणार असल्याचेही सूचित केले. मात्र तशी प्रत्यक्ष घोषणा त्यांनी केली नाही. पण आपला प्रवास त्याच दिशेने सुरू असणार असे संकेत त्यांनी दिले.

“आम्ही अमेरिकेच्या संसदेमध्ये पुन्हा येणार आहोत. सिनेटमध्ये आम्ही विजयी होणार आहोत. त्यानंतर व्हाइट हाउसमध्येही रिपब्लिकन पक्ष विजय मिळवणार आहे.’ असे ते म्हणाले.
आपण नवीन पक्ष स्थापन केल्यावर अमेरिकेतील पुराणमतवादी मतदारांमध्ये फूट पडेल. त्यामुळे आपण तसे करण्याची शक्‍यता ट्रम्प यांनी फेटाळून लावली.

त्याचबरोबर 2022 मध्ये अध्यक्षपदाची मुदतपूर्व निवडणूक होईल. त्यासाठी आपल्या समर्थकांनी एकत्र यावे, असे आवाहनही त्यांनी केले. ट्रम्प जर 2024 च्या प्राथमिक फेरीमध्ये विजयी झाले तर ट्रम्प यांना पाठिंबा देण्याची ग्वाही यावेळी मिट रॉमनी यांच्यासारख्या रिपब्लिकन पक्षाच्या ज्येष्ठ सिनेटरनी दिली.

ट्रम्प यांच्यावर दोन वेळा महाभियोग चालवला गेला असला तरी रिपब्लिकन पक्षामध्ये त्यांची लोकप्रियता प्रचंड आहे, असे जनमत चाचणीद्वारे लक्षात येते आहे. आपल्या 90 मिनिटांच्या भाषणात ट्रम्प यांनी वारंवार डेमोक्रॅटिक पक्ष आणि जो बायडेन यांच्यावर टीका केली. बायडेन यांच्या प्रशासनाची धोरणे देशाला समाजवादाच्या दिशेने नेत आहेत. त्या दिशेने देशाची वाटचाल व्हायला नको.

बायडेन यांची धोरणे रोजगार विरोधी, कुटुंबविरोधी, सीमाविरोधी, ऊर्जाविरोधी, महिलाविरोधी आणि विज्ञानविरोधी आहे. बायडेन यांचे धोरण आणखी किती डाव्याबाजूला झुकणार आहे, हे कोणीही सांगू शकत नाही, अशी टीका त्यांनी केली. बायडेन यांनी देशाच्या सीमा निर्वासितांसाठी खुल्या केल्या. नोव्हेंबर 2020 च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात घोटाळा झाल्याचा आरोप त्यांनी पुन्हा केला आणि या निवडणूकीत ते खरोखर जिंकले होते, असेही सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.