माघारीच्या निर्णयाचे बायडेन यांनी केले समर्थन

वॉशिंग्टन  – अफगाणिस्तानातून सैन्य माघारीचा निर्णय मी स्वत:च घेतला आहे असे जाहीर करीत अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी या निर्णयाचे प्रथमच जाहीर समर्थन केले आहे. अफगाणिस्तानचे सरकार कोसळण्याची जी प्रक्रिया घडली आहे ती अपेक्षेपेक्षा खूपच लवकर झाली असे निरीक्षणही त्यांनी नोंदवले आहे.

त्यांनी या बाबतच्या स्थिती विषयी तपशीलाने चर्चा केली आहे. ते म्हणाले की सैन्य माघारीच्या निर्णयावर ठाम राहायचे की तेथे पुन्हा हजारो सैनिक पाठवून पुन्हा तिसऱ्या दशकातील लढाईला सामोरे जायचे असे दोन पर्याय माझ्यापुढे होते. पण यापुर्वी झालेल्या चुकांची पुनरूक्ती करायची नाही असा निर्णय मी पसंत केला आणि सैन्य माघारीचा पर्याय स्वीकारला. हा माझा स्वत:चा निर्णय असून मी माझ्या निर्णयावर ठाम आहे असेही त्यांनी म्हटले आहे.

व्हाइट हाउसच्या ईस्ट रूम मधून त्यांनी आज देशाला उद्देशून भाषण केले त्यात त्यांनी वरील विधाने केली आहेत.

ते म्हणाले की गेल्या 20 वर्षाच्या अनुभवावरून अफगाणिस्तानच्या बाबतीत एक बाब स्पष्ट झाली आहे की, अमेरिकेचे सैन्य माघारी घेण्यासाठी तेथे कधीच चांगला काळ नव्हता. अमेरिकेचे सैन्य माघारी घेण्याची प्रक्रिया पुर्ण करण्याची जबाबदारी अमेरिकेच्या पाचव्या अध्यक्षांकडे सोपवण्याऐवजी मी लोकांची टीका सहन करण्याचा पर्याय स्वीकारला आणि ही प्रक्रिया पुर्ण केली.

मी घेतलेला निर्णय अमेरिकेसाठी अत्यंत योग्यच निर्णय आहे असे समर्थनही बायडेन यांनी या भाषणात केले. अमेरिकेचे अफगाणिस्तानातील वास्तव्य हे अमेरिकेच्या राष्ट्रीय हिताचे नव्हतेच. तालिबान अफगाणिस्तानात इतक्‍या लवकर कब्जा मिळवेल हे आपल्याला अपेक्षित नव्हते याची जाहीर कबुलीही बायडेन यांनी यावेळी दिली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.