वॉरसॉ – अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी शनिवारी युक्रेनच्या दोन प्रमुख मंत्र्यांची भेट घेतली. रशियाकडून युक्रेनवरील हल्ले सुरूच असल्याच्या पार्श्वभूमीवर त्या भेटीचे महत्व वाढले आहे.
रशियाच्या आक्रमणाला महिन्याचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर बायडेन शुक्रवारी युक्रेनचा शेजारी असणाऱ्या पोलंडच्या दोन दिवसीय दौऱ्यासाठी दाखल झाले. त्यांनी दौऱ्याच्या पहिल्या दिवशी युक्रेनच्या सीमेजवळ पोलंडच्या हद्दीत तैनात असणाऱ्या अमेरिकी सैनिकांशी आणि युद्धामुळे निर्वासित झालेल्यांना मदत करणाऱ्यांशी संवाद साधला.
त्यानंतर पोलंडची राजधानी वॉरसॉमध्ये बायडेन यांनी युक्रेनचे परराष्ट्र मंत्री दिमित्रो कुलेबा आणि संरक्षण मंत्री ओलेक्सी रेझनिकोव यांची भेट घेतली. युद्ध सुरू असताना युक्रेनच्या मंत्र्यांनी देशाबाहेर केलेला तो दुर्मिळ दौरा ठरला. रशियाचा समर्थपणे मुकाबला करण्यासाठी युक्रेनकडून आंतरराष्ट्रीय समुदायाला मदतीचे साकडे घातले जात आहे. अशात बायडेन आणि दोन मंत्र्यांची भेट युक्रेनचे मनोधैर्य वाढवणारी ठरणारी आहे.
दरम्यान, तुमचे स्वातंत्र्य ही आमची जबाबदारी आहे, अशा शब्दांत बायडेन यांनी पोलंडला सुरक्षिततेची ग्वाही दिली. रशियाकडून कुठला हल्ला झाल्यास नाटोचा सदस्य असणाऱ्या पोलंडच्या संरक्षणासाठी पुढे येण्याचा शब्द त्यांनी दिला. रशियन हल्ल्यानंतर मोठ्या संख्येने युक्रेनचे नागरिक देशाबाहेर पडले. त्यातील अनेकांनी पोलंडमध्ये आश्रय घेतला आहे.