H-1B व्हिसावरील बंदीची कालमर्यादा समाप्त; हजारो भारतीय तरुणांना होणार फायदा

वॉशिंग्टन – अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या काळात “एच-1बी’ व्हिसावर घालण्यात आलेल्या बंदीची कालमर्यादा समाप्त झाली आहे. त्यामुळे अमेरिकेत माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्या हजारो भारतीय युवकांना आता तिथे आपल्या मनासारखा रोजगार शोधणे सोपे होणार आहे.

कोविड-19 मुळे गेल्या वर्षी जूनमध्ये लागू असलेल्या लॉकडाऊनच्याच काळात ट्रम्प यांनी अमेरिकेत येणाऱ्यांच्या “वर्क व्हिसा’ आणि प्रामुख्याने “एच-1बी’ व्हिसावर बंदी घातली होती. या व्हिसामुळे अमेरिकेतील रोजगाराच्या संधी बाहेरील व्यक्‍तींना मिळत असल्याचे कारण देण्यात आले होते.

गेल्या वर्षी 31 डिसेंबरला ट्रम्प यांनी “एच-1बी’वरील बंदीच्या आदेशाला 31 मार्च 2021 पर्यंत मुदतवाढ दिली होती. करोनाच्या साथीमुळे अमेरिकेतील जीवनमान धोक्‍यात आले आणि बेरोजगारीमध्ये मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे अमेरिकेतील कामगारांपुढे मोठे आर्थिक आव्हान उभे असल्याने या बंदीला मुदतवाढ देणे आवश्‍यक असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले होते.

मात्र सत्तांतर झाल्यावर जो बायडेन यांनी 31 मार्च नंतर “एच-1बी’वरील बंदीला मुदतवाढ देण्यासंदर्भात नव्याने कोणतेही आदेश दिले नाहीत. इमिग्रेशनसंदर्भात ट्रम्प यांचे धोरण दुष्टपणाचे असल्याचे सांगून “एच-1बी’वरील बंदी उठवण्याचे आश्‍वासन बायडेन यांनी दिले होते.

सैंद्धांतिक आणि तांत्रिक कौशल्य असलेल्या विदेशी कर्मचाऱ्यांना अमेरिकेतील कंपन्यांकडून “एच-1बी’ व्हिसाच्या आधारे अमेरिकेतील नोकऱ्या देऊ केल्या जातात. अमेरिकेतील तंत्रज्ञानविषयक कंपन्या यासाठी भारत आणि चीनमधील तरुणांवरच विशेषत्वाने अवलंबून असतात. “एच-1बी’ वरील बंदी समाप्त झाल्याने आता हजारो भारतीय तरुण अमेरिकेतील नोकऱ्यांसाठी प्रयत्न करू शकणार अहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.