Joe Biden: अमेरिकेतील बायडन सरकारचा कार्यकाळ लवकरच पूर्ण होणार असून, जानेवारी 2025 मध्ये डोनाल्ड ट्रम्प सत्ता हातात घेतील. मात्र, सत्तेतून पायउतार होण्याआधी अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडन यांनी शेकडो लोकांची शिक्षा कमी केली आहे. तसेच, काहीजणांची शिक्षा पूर्णपणे माफ केली आहे.
बायडन यांनी जवळपास 1500 लोकांच्या शिक्षेत कपात केली आहे. या नागरिकांना करोना व्हायरस महामारीच्या काळात घरी बंदिवासात ठेवण्यात आले होते. याशिवाय, अहिंसक गुन्ह्यांसाठी शिक्षा झालेल्या 39 नागरिकांची शिक्षा पूर्णपणे माफ करण्यात आली आहे. अमेरिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच एका दिवसात एवढ्या नागरिकांची शिक्षा माफ करण्यात आली. यामध्ये वर्षभर घरी शिक्षा भोगल्यानंतर सुटका करण्यात आलेल्या नागरिकांचा समावेश आहे.
कोव्हिडच्या काळात तुरुंगात असलेल्या गुन्हेगारांमध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरसचा प्रसार होण्याची शक्यता असल्याने त्यांची सुटका करण्यात आली होती. याआधी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी देखील वर्ष 2017 मध्ये कार्यकाळ पूर्ण होण्याआधी 330 जणांची शिक्षा माफ केली होती.
शिक्षा माफ करतानाचा निर्णय घेताना बायडन म्हणाले की, अमेरिकेची उभारणी ही आश्वासन आणि पुन्हा संधी देण्यावर झाली आहे. अमेरिकन नागरिकांना पुन्हा संधी मिळावी व त्यांना नियमित आयुष्य जगात यावे, यासाठी माफ करण्याचा विशेष अधिकार मला आहे.
दरम्यान, यापूर्वी बायडन यांनी यापूर्वी त्यांचा मुलगा हंटर बायडन यांच्या क्षमा याचिकेवर देखील स्वाक्षरी केली होती. हंटर यांच्यावर शस्त्र बाळगणे व कर चुकवेगिरीसाठी गुन्हा दाखल करण्यात आला होता. हंटर यांना माफी दिल्यानंतर इतर नागरिकांनाही क्षमा करावी, यासंदर्भात बायडन प्रशासनावर दबाव टाकण्यात येत होता.
तसेच, 2020 च्या अध्यक्षीय निवडणुकीनंतर झालेल्या दंगलीतील गुन्हेगारांची शिक्षा माफ करावी की नाही, यावर देखील विचार केला जात आहे. सध्या क्षमा करण्यात आलेल्यांमध्ये अहिंसक गुन्ह्यांसाठी शिक्षा झालेल्या नागरिकांचा प्रामुख्याने समावेश आहे. डोनाल्ड ट्रम्प हे 20 जानेवारी 2025 ला सत्ता हातात घेणार असून, त्यापूर्वी बायडन सरकारकडून आणखी काही जणांच्या शिक्षेत कपात केली जाण्याची शक्यता आहे.