वॉशिंग्टन – अमेरिकेतील करोनाची स्थिती हाताळण्यात अध्यक्ष ट्रम्प यांना साफ अपयश आले असून आर्थिक उपाययोजनांच्या नावाखाली त्यांनी फक्त मोठे उद्योगपती आणि कंपन्यांनाच मदत पुरवली आहे, असा आरोप अध्यक्षीय निवडणुकीतील डेमोक्रॅटिक पक्षाचे संभाव्य उमेदवार ज्यो बिडेन यांनी केला आहे. बिडेन हे अमेरिकेचे माजी उपराष्ट्राध्यक्षही आहेत. बिडेन म्हणाले की, एकट्या एप्रिल महिन्यात अमेरिकेतील 2 कोटी 5 हजार जणांचे रोजगार बुडाले आहेत. त्यामुळे अमेरिकेचा बेरोजगारीचा दर 14.7 टक्क्यांवर गेला आहे ही अभुतपूर्व स्थिती आहे.
करोनाच्या संबंधात दक्षतेचे उपाय योजण्यात या प्रशासनाला मोठाच विलंब झाला. आर्थिक अडचणीत मोठीच वाढ झाली असून त्यावरही उपाययोजना करण्यास अध्यक्ष ट्रम्प यांना अपयश आले आहे. गेल्या तीन वर्षांत ट्रम्प यांना अमेरिकन अर्थव्यवस्थेचा गाभाच लक्षात न आल्याने देशाची अर्थव्यवस्था खिळखिळी झाली आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे. लोकांना घरात कोंडून ठेवतानाच अर्थव्यवस्थेलाही त्यांनी कोंडून ठेवले आहे. एकूणच अर्थव्यवस्थेत त्यांनी मोठ्या चुका केल्या आहेत त्या देशाला भोगाव्या लागत आहेत, असा आरोपही बिडेन यांनी केला.