सत्तेवर येण्यापुर्वीच ज्यो बायडेन यांनी जाहीर केले 1.9 ट्रिलियन मदतीचे पॅकेज

- सामान्य नागरीक, व्यापारी व उद्योजकांना होणार थेट मदत - प्रत्यक्ष सत्ता स्वीकारल्यानंतर ऐतिहासिक स्वरूपाच्या गुंतवणुकीची दिली ग्वाही

वॉशिंग्टन – अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी अमेरिकेतील नागरीकांना करोना काळातील नुकसानीच्या मदतीसाठी तब्बल 1.9 ट्रिलियन डॉलर्स मदतीचे पॅकेज जाहीर केले आहे. त्यातून सामान्य नागरीक, व्यापारी आणि उद्योजकांना थेट स्वरूपात आर्थिक मदत दिली जाणार आहे. प्रत्यक्ष सत्ता स्वीकारण्यापुर्वीच बायडेन यांनी ही जी छप्पर फाडके मदत दिली आहे त्यातून नागरीकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

त्यांनी जाहीर केलेल्या मदतीनुसार यातील 1 ट्रिलियन डॉलर्स अमेरिकेतील नागरीक आणि कुटुंबियांना थेट मदत म्हणून दिले जाणार आहेत. तसेच व्यावसायिकांना 440 अब्ज डॉलर्सची मदत दिली जाणार आहे. त्यात रोजगार गमावलेल्यांना चौदाशे डॉलर्स प्रत्येकी दिले जाणार आहेत. करोनाच्या लसीकरणासाठी त्यांनी 20 अब्ज डॉलर्सच्या तरतूदींची घोषणा केली असून करोना चाचणीसाठी 50 अब्ज डॉलर्सची तरतूद करण्यात आली आहे.

या पॅकेजची घोषणा करताना बायडेन यांनी म्हटले आहे की आपण अशा प्रकारची रोगाची साथ व त्याचे भीषण परिणाम प्रथमच अनुभवले आहेत. त्यातून आपल्याला अशा प्रकारच्या आर्थिक संकटाला पहिल्यांदाच सामोरे जावे लागले आहे. यातून नागरीकांना अनेक यातना सोसाव्या लागल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या मदतीसाठी आणखी वाट पहाण्यात अर्थ नाही त्यामुळे आत्ताच आपल्याला काही तरी करावे लागेल म्हणून आम्हीं हे पॅकेज जाहीर करीत आहोत असे बायडेन यांनी नमूद केले.

करोनाचा सर्वाधिक फटका अमेरिकेला बसला असून त्या देशातील तब्बल 2 कोटी 33 लाख लोकांना आत्तापर्यंत करोनाची लागण झाली आहे. सुमारे चार लाख लोकांचा यात बळी गेला आहे. आपली काहीही चूक नसताना आपल्याला हा फटका बसला आहे. त्यातून आपल्या नोकऱ्या गेल्या आहेत आणि अर्थकारणाची सारी घडी विस्कटली आहे.

अमेरिकेतील चार लाख छोटे व्यवसाय कायमचे बंद झाले असून सुमारे 1 कोटी 80 लाख जणांना अजूनही नोकरी मिळालेली नाही. त्यांची गुजराण अजूनही बेरोजगार भत्त्यावर सुरू आहे. या पार्श्‍वभूमीवर अमेरिकन नागरीकांना थेट आर्थिक मदत देण्याची गरज असून ती गरज या पॅकेज मधून भागू शकेल असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.

प्रत्यक्ष सत्ता हातात आल्यानंतर आपण पायाभूत सुविधा, मॅन्युफॅक्‍चरिंग, संशोधन आणि विकास, पर्यावरण पूरक उर्जा या क्षेत्रात ऐतिहासिक स्वरूपाची गुंतवणूक करू अशी ग्वाहीहीं त्यांनी दिली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.