वॉशिंग्टन – पाकिस्तानी वंशाचा कॅनडीयन दहशतवादी तहव्वुर राणा याला भारतात पाठवण्यात यावे अशी भूमिका अमेरिकेतील बायडेन प्रशासनाने लॉस एंजल्स येथील फेडरल कोर्टाच्या सुनावणीच्यावेळी घेतली.
भारतात सन 2008 साली मुंबईवर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणात त्याची तेथे गरज आहे असे बायडेन प्रशासनाने कोर्टाला कळवले आहे. 59 वर्षीय राणा याला भारताने या प्रकरणात फरारी आरोपी म्हणून घोषित केले आहे. भारताने 10 जून 2020 मध्येच लॉस एंजल्स येथील फेडरल कोर्टात राणाला आमच्या हवाली केले जावे अशी मागणी केली आहे.
भारताची ही मागणी रास्त आहे आणि त्या संबंधात पुरेसे पुरावेही उपलब्ध आहेत असे बायडेन प्रशासनाच्यावतीने आजच्या सुनावणीच्यावेळी सांगण्यात आले. भारतानेही राणाच्या हल्ल्यातील सहभागाच्या संबंधात महत्वाचे पुरावे अमेरिकेतील कोर्टात सादर केले आहेत. त्यातच आज बायडेन प्रशासनानेही भारताच्या मागणीला अनुकुल भूमिका घेतल्याने राणा भारताच्या ताब्यात येण्याचा मार्ग सुकर झाला आहे असे मानण्यात येत आहे.