दिशाभूल करून निवडणुका जिंकायच्या हेच भाजप-सेना युतीचं ब्रीद: अजित पवार

बारामती: धनगर समाजानं आंदोलनाचा पवित्रा घेताच त्या धास्तीनं या फसव्या देवेंद्र फडणवीस सरकारनं आरक्षण देण्याचं आश्वासन दिलं. त्या कामासाठी TISS संस्थेला हाताशी धरून अहवाल बनवला. पण आजपर्यंत या अहवालात काय आहे, हे जाहीर केलं नाही. आदिवासी समाजालाही सुविधांचे केवळ गाजर या सरकारनं दाखवले आहेत, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केली आहे. ते राष्ट्रवादीचे लोकसभेचे उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत बोलत होते.

अजित पवार म्हणाले, या सरकारनं दाखवलेल्या नियोजन शून्यतेमुळे शेतकऱ्यांना पाण्यापासून वंचित राहावं लागत आहे. मुख्यमंत्री बारामतीत येऊन सांगतात, निरा नदीचं पाणी उचलून कऱ्हा नदीत घेऊ. पण जर निरा नदीतच पाणी नसेल तर,कऱ्हा नदीत येणार कुठून? लोकांची दिशाभूल करून निवडणुका जिंकायच्या हेच भाजप-शिवसेना युतीचं ब्रीद असल्याचे ते म्हणाले.

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून १७५ शेतकऱ्यांनी कर्जापायी आपलं जीवन संपवलं. या भाजप सरकारच्या कार्यकाळात तब्बल १५ हजार शेतकऱ्यांच्या पत्नी विधवा झाल्या. पण या भावनाशून्य सरकारला त्याचं काही सोयरसुतक नाही. कर्जमाफीचं आश्वासन देणारं हे बंडलबाज सरकार आहे.

जनतेला सांगण्यासारखी कामं केली नसल्यानं दुसऱ्यांची उणी-धुणी काढण्याचं काम भाजपावाले करत आहेत. इंदू मिलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाची वीट देखील रचलेली नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं काम का सुरू झालं नाही? महापुरुषांच्या नावानं केवळ मतांचं राजकारण करत आहेत. असेही पवार म्हणाले.

देशाचे पंतप्रधान म्हणतात, ऊस उत्पादकांचे प्रश्न न सोडवता पवारांनी स्वतःची कारखानदारी चालवली. हे खोटं आहे. पवार साहेबांनी साखरेच्या आयात-निर्यातीच्या व्यवहारातलं धोरण बदललं. ऊसाला चार आकडी भाव दिला. कारखानदारी अडचणीत आल्यानं शून्य टक्के व्याजानं शेतकऱ्यांना सॉफ्ट लोन दिलं.

भीमा-पाटस साखर कारखान्याच्या कामगारांना २२ महिन्यांचा पगार मिळाला नाही, मग दौंडच्या आमदारांनी तालुक्यासाठी काय केलं? याउलट आपली सूतगिरणी अडचणीत आली, म्हणून आपण बारामतीत हाय-टेक टेक्स्टाईल पार्क उभारलं ज्यातून ६००० पेक्षा जास्त महिलांना रोजगार मिळाला. या भाजपा-शिवसेनावाल्यांनी बारामतीत कोणता उद्योग आणला? असा प्रश्नही अजित पवारांनी उपस्थित केला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.