वनखात्याने ठश्यांची पाहणी करून केली खात्री
वरवंड – कुसेगाव येथे रविवार (दि. 1) सायंकाळी सातच्या सुमारास कुसेगावचे पोलीस पाटील गणेश शितोळे यांसह ग्रामस्थांना बिबट्या दिसला. बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थांतर्फे करण्यात येत आहे . वनविभागाच्या वतीने कुसेगाव येथे ठश्यांची पाहणी करण्यात आली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, रविवार (दि. 1) कुसेगाव येथे भानोबा देवाचे आगमन झाले होते. देवाची आरती झाल्यानंतर गणेश शितोळे हे घरी परतले हाते. त्यावेळी गणेश शितोळे यांचे चुलते प्रताप शितोळे यांना कुत्रे भुंकण्याचा आवाज आला, त्या दिशेने बॅटरीच्या उजेडात पाहिले त्यांनी, गणेश शितोळे यांसह बाकीच्या लोकांनी पाहिले असता सुमारे 200 फूटांवर उसाच्या शेतात बिबट्या जाताना त्यांना दिसला.
आज (दि. 2) सकाळी पाटस येथील वनरक्षक पद्मिनी कांबळे आणि वनविभागाचे वॉचमन यांनी कुसेगाव येथे जाऊन ठश्यांची पाहणी करून येथे बिबट्याच आला असावा असा अंदाज व्यक्त केला आहे. कुसेगाव ग्रामपंचायतीचे पत्र मिळाले की पिंजरा लावण्यात येईल, अशी माहिती वनरक्षक कांबळे यांनी दिली. कुसेगाव ग्रामपंचायतीच्या वतीने बिबट्या पकडण्यासाठी पिंजरा लावण्याबाबत पत्र देण्यात आले असल्याचे सरपंच रमेश भोसले यांनी यावेळी सांगितले.