मुलखेड येथे बिबट्या जेरबंद

Madhuvan

माणिकडोह येथे रवानगी : नागरिकांनी सोडला सुटकेचा निश्‍वास

पिरंगुट – मुलखेड (ता. मुळशी) येथे एका विबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले. त्यामुळे बिबट्याच्या दहशतीखाली असलेल्या परिसरातील शेतकरी व नागरिकांनी सुटकेचा निश्‍वास सोडला आहे.

हिंजवडी-माण आयटीनगरीच्या जवळच असलेल्या मुलखेड गाव आहे. अनेक दिवसांपासून गावात बिबट्याचा वावर असल्याच्या कुणकुण होती. ही माहिती समजल्याने वनविभागाने या भागात पिंजरा लावला होता. मंगळवारी लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या सापडला नव्हता. मात्र, बुधवारी (दि. 4) पिंजऱ्याची जागा बदलत तो आयटी नगरीच्या फेज तीन जवळील चांदे फाट्याच्या पुढे आयनाळ वस्तीतल्या शेतात लावण्यात आला, त्याचबरोबत त्यात भक्ष्यही ठेवण्यात आले होते, त्यामुळे रात्री दहा वाजता भक्ष्याच्या शोधात आलेला बिबट्या पिंजऱ्यात अलगद बंद झाला.

जवळच घर असलेल्या लोकांना त्याचा आवाज येऊ लागल्याने त्या लोकांनी गावात कळवले. त्यानंतर तिथे वन विभागाचे अधिकारी, रेस्क्‍यू टीम, ग्रामस्थं, तरूण आले. बिबट्याचा पिंजरा कापडाने झाकून त्याला रेस्क्‍यू व्हॅनमध्ये चढवण्यात आला. हा जेरबंद बिबट्या जुन्नरला माणिकडोह येथील निवारा केंद्रात नेण्यात येणार असल्याची माहिती वनक्षेत्र अधिकारी पी. व्ही. कापसे यांनी सांगितले.

बिबट्याला रेस्क्‍यू करण्यासाठी भुगाव येथून रेस्क्‍यू टीम त्वरित घटनास्थळी आली होती. त्यातील 7-8 जण या कारवाईत सहभागी झालेले होते. वन अधिकारी कापसे, वनपाल मीरा केंद्रे, हिरेमठ, ग्रामस्थ व तरूण यांनी यात रेस्क्‍यू कामी मदत केली. मुलखेडचे माजी सरपंच बाळासाहेब तापकीर, सुखदेव तापकीर ग्रामस्थ येथे उपस्थित होते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.