नगर -नगर शहरालगत असलेल्या चांदबिबी महाल वनक्षेत्र परिसरात सोमवारी (दि.23) रात्री तीन ते चार बिबटे एकाच वेळेस फिरताना दिसून आले. नगर शहरातील व्यावसायिक मिलिंद कुलकर्णी हे रात्री आपल्या कुटुंबासह चांदबिबी महाल परिसरात चार चाकी वाहनातून फिरायला गेले होते. त्यावेळी त्यांना एकाच ठिकाणी तीन ते चार बिबटे दिसले. त्यांनी या बिबट्यांचे चित्रीकरण देखील केले. समाज माध्यमांवर हे चित्रीकरण चांगलेच व्हायरल झाले आहे.
चांदबिबी महाल वनक्षेत्र परिसरातून पुढे पाथर्डीपर्यंत गर्भगिरी अरण्याचा पट्टा सुरू होतो. पाथर्डीतील वनक्षेत्र परिसरामध्ये बिबट्याचे नागरिकांवर हल्ले होत आहेत. शिरसाटवाडी परिसरातील तीन बालकांचा मृत्यू बिबट्याच्या हहल्ल्यात झाला आहे. काल भगवानगड परिसर पायथ्याशी देखील बिबट्याने महिलेवर हल्ला केला. यातच चांदबिबी वनक्षेत्र परिसरामध्ये एकाच वेळेस तीन ते चार बिबटे एकाच ठिकाणी दिसण्याची घटना घडली आहे.
त्यामुळे या परिसरातील व्यक्तींनी पहाटे पायी फिरण्यास, सायकल किंवा दुचाकीवरून जाऊ नये, रात्रीच्या वेळेस या भागामध्ये संचार टाळावा, असे आवाहन वनविभागाने केले आहे. दरम्यान, वन विभागाने उद्यापासून चांदबिबी महाल परिसरातील वनक्षेत्रामध्ये येण्यास नागरिकांना प्रतिबंध करण्यात येणार आहे. विनापरवानगी वनक्षेत्रात फिरल्यास संबंधित नागरिकांवर कारवाई करण्याचा इशाराही वन विभागाने दिला आहे.