बिबट्याची कूच आता गावाकडून शहराकडे

थेऊर  -एरवी ग्रामीण भागात असणारा बिबट्या आता पुणे शहराजवळ पोहाचला आहे. हवेली तालुक्‍यातील फुरसुंगी येथील सोनारपूल परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे सिद्ध झाले आहे. यामुळे या परिसरातील शेतकरी व स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

दोन महिन्यांपूर्वी मांजरी येथील मुळा – मुठेच्या परिसरात बिबट्याने दर्शन दिले होते. त्यामुळे वनविभाग या परिसरावर लक्ष ठेवून होता. बुधवारी (दि. 12) डॉ. स्वप्निल कसबे हे हांडेवाडी येथून रूग्णतपासणीसाठी फुरसुंगी मार्गे कवडीपाट येथील रूग्णालयात येत असताना रात्री पावणेनऊच्या सुमारास ते सोनारपूल येथील पहिल्या वळणावर आले असता त्यांना उजव्या बाजूला डोळे चमकत असल्याचे दिसले. त्यांना ते कुत्रा आहे असे वाटले.

त्यांनी स्ट्रीट लाईट लावली असता रस्त्याच्या कडेला असलेल्या झुडपात सुमारे तीन फूट उंचीचा बिबट्या दिसला. त्याने डरकाळी फोडली. तेवढ्यात पुढील बाजूने एक बोलेरो आली. त्यावेळी बिबट्या शेजारी असलेल्या उसाच्या शेतात निघून गेला. ही बाब त्यांनी डॉ. राहुल काळभोर यांना सांगितली. ग्रामस्थांना समजल्यानंतर वनविभागाला कळविण्यात आले. वनपाल राहुुल रासकर हे तात्काळ घटनास्थळी पोहोचले. त्यांनी पाहणी केली असता त्यांना शेतात बिबट्याच्या पावलांचे ठसे आढळून आले. परिसरांत मोठ्या प्रमाणात उसाचे क्षेत्र असल्याने उसात घुसून पाहणी करण्याचा धोका पत्करला नाही; परंतु वनविभाग त्यांवर लक्ष ठेवून आहे.

पूर्व हवेलीत यापूर्वी आळंदी म्हातोबाची येथे काही महिन्यांपूर्वी एक बिबट्या मृृतावस्थेत मिळून आला होता. दोन महिन्यांपूर्वी मांजरी व बिवरी परिसरात त्याचे अस्तित्व जाणवले आहे. कोलवडी, मांजरी व फुरसुंगी परिसरात आढळून आलेला बिबट्या व परिसरात असलेल्या बिबट्याचे ठसे एकच आहेत. त्यामुळे तो एकच असण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. असे असले तरी आम्ही दोन्ही गावांमध्ये जनजागृती करत असून गस्तीपथक तैनात केले आहे.
-राहुल रासकर, वनपाल

Leave A Reply

Your email address will not be published.