भुशी धरण “ओव्हर फ्लो’

लोणावळा (वार्ताहर) – लोणावळा शहरात पावसाळी पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांचे सर्वाधिक आकर्षक स्थळ असलेला भुशी धरण शनिवारी (दि. 4) “ओव्हर फ्लो’ झाले आहे.

गतवर्षी भूशी धरण 26 जून रोजीच “ओव्हर फ्लो’ झाले होते. त्या तुलनेत यंदा किमान आठ दिवस उशिरा हे धरण भरले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत लोणावळा शहरात यंदा अजूनपर्यंत पावसाचा जोर तुलनेत फारच कमी राहिला आहे. गेल्या वर्षी 4 जुलै रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत शहरात 891 मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली होती. यंदा 649 मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. त्यातही मागील तीन दिवसांत शहरात 2 मिलीमीटर, 0 मिलीमीटर आणि 28 मिलीमीटर असा पाऊस नोंदविण्यात आला आहे. लोणावळा शहरापेक्षा शहराच्या आसपासच्या डोंगर भागात पावसाचा जोर जास्त असल्याने धरणात मोठ्या प्रमाणात पाणी वाहून आल्याने धरण “ओव्हर फ्लो’ झाल्याचे सांगण्यात येत आहे.

पावसाळी पर्यटनाला लोणावळ्यात येणाऱ्या पर्यटकांसाठी भुशी धरण म्हणजे अक्षरशः पंढरी समजली जाते. धरण ओव्हर फ्लो झाल्यानंतर प्रत्येक शनिवारी आणि रविवारी तसेच सुट्ट्यांच्या दिवशी याठिकाणी लाखोंच्या संख्येने पर्यटक येत असतात. मात्र यंदा करोनाच्या पार्श्‍वभूमीवर तसेच भुशी धरणाच्या पाण्यात बुडून दगावणाऱ्या पर्यटकांचे कारण देत यंदा या धरणावर पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे पर्यटकांच्या संख्येने सातत्याने फुलून जाणारे भुशी धरण यावेळी मात्र सुने सुने राहणार आहे. आणि याचा फटका येथील स्थानिक व्यावसायिकांना देखील मोठ्या प्रमाणावर बसणार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.