भुसार बाजार तूर्तास बंदच

शनिवारच्या बैठकीत होणार पुढील निर्णय


करोनामुळे दी पुना मर्चंट्‌स चेंबरचा पवित्रा

पुणे – मार्केटयार्डातील गूळ-भुसार विभागात करोना विषाणूचा शिरकाव झाला आहे. या पार्श्‍वभूमीवर तूर्तास बाजार बंद ठेवण्याचा निर्णय दी पुना मर्चंट्‌स चेंबरने घेतला आहे. येत्या शनिवारी पुन्हा चेंबरच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलविण्यात येणार आहे. या बैठकीत बाजार बंदच ठेवायचा की सुरू करायचा, याबाबत निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती दी पुना मर्चंटस्‌ चेंबरचे अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल यांनी दिली.

ओस्तवाल म्हणाले, “भुसार विभागातील व्यापारी, कामगार आणि त्यांच्या कुटुंबातील काही सदस्यांना करोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे व्यापारीवर्गांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मागील पावणेदोन महिन्यांपासून व्यापारी पुणेकरांना सेवा देत आहेत. विषाणूंची साखळी तोंडण्यासाठी तसेच हा विभाग निर्जंतुकीकरण करण्यासाठी आणखी वेळ लागणार आहे. त्यामुळे व्यवसाय बंद ठेवण्याच्या मागणीवर व्यापारी ठाम आहेत. पुन्हा येत्या शनिवारी व्यापाऱ्यांची बैठक बोलविली जाणार आहे. त्याच बैठकीत पुढील निर्णय घेतला जाईल.

दरम्यान, सोमवारी पणन संचालकांच्या अध्यक्षतेखाली व्यापारी आणि बाजार समिती प्रशासक बी. जे. देशमुख यांची बैठक झाली. या बैठकीत भुसार विभागात योग्य ती खबरदारी व उपाययोजना करण्यात येणार असल्याचे बाजार समितीने आश्‍वासन दिले.

मात्र, विभागाचे निर्जंतुकीकरण करणे, विषाणूंची साखळी तोडण्यासाठी काही काळ व्यवहार पूर्णत: बंद ठेवावे लागणार आहेत. शनिवारच्या बैठकीत सकारात्मक निर्णय होण्याचे संकेत आहेत. या बैठकीत बाजार सुरू करण्याचा निर्णय झाल्यास पुन्हा येत्या सोमवारपासून भुसार बाजार सुरू होऊ शकतो.
संघटनेचे अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीला अशोक लोढा, विजय मुथा, प्रवीण चोरबेले, जवाहरलाल बोथरा, राजेंद्र बाठिया, नितीन नहार, रायकुमार नहार आदी पदाधिकारी उपस्थित होते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.