भुसार बाजार सोमवारपासून पुन्हा सेवेत

भाजीपाला विभाग सुरू करण्यासाठी प्रयत्न


प्रशासन आणि संघटनांची मंगळवारी बैठक

पुणे – मार्केट यार्डातील भुसार विभाग येत्या सोमवारपासून (दि. 25) सुरू होणार आहे. तर, भाजीपाला विभाग सुरू करण्यासाठी बाजार समितीतर्फे प्रयत्न सुरू केले आहेत.

यासंदर्भात मंगळवारी (दि.26) बाजार समिती प्रशासन, श्री छत्रपती शिवाजी महाराज आडते असोसिएशन, हमाल पंचायत, टेम्पो आणि इतर संघटनांची बैठक होणार असल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक बी.जे.देशमुख यांनी दिली. या बैठकीमध्ये भाजीपाला विभाग सुरू करण्यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्‍यता आहे.

करोनाच्या पार्श्‍वभूमीवर फूल, फळ, भाजीपाला, कांदा-बटाटा विभाग बंद आहे. नागरिकांना अन्नधान्य आणि किराणाचा पुरवठा व्हावा, या हेतूने गूळ-भुसार विभाग सुरू होता. मात्र, भुसार बाजारातील काही जणांना करोना झाल्याचे निष्पन्न झाले. या पार्श्‍वभूमीवर दि पूना मर्चंट्‌स चेंबरने 19 मेपासून अनिश्‍चित काळासाठी भुसार बाजार बंद करण्याची भूमिका घेतली होती. यानंतर जिल्हाधिकारी नवल किशोर राम, बाजार समितीचे प्रशासक बी.जे.देशमुख आणि दि पूना मर्चंट्‌स चेंबरचे अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल, माजी अध्यक्ष आणि नगरसेवक प्रवीण चोरबेले यांच्या उपस्थितीत बैठक झाली. यामध्ये भुसार बाजार सुरू करण्याचा निर्णय झाल्याचे देशमुख यांनी सांगितले. करोना प्रादुर्भाव असला, तरी बाजार जास्त दिवस बंद ठेवणे योग्य ठरणार नाही. हा बाजार सुरू करण्यासाठी बाजार समितीने प्रयत्न सुरू केले आहेत.

असे सुरू होणार व्यवहार
– सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत सुरू राहणार
– अनसोल्ड शेतीमालाची आवक पूर्णपणे बंद
– दररोज फक्त 100 वाहनांनाच देण्यात येणार प्रवेश
– प्रवेशद्वार पाचमधूनच माल घेऊन येणाऱ्या वाहनांना प्रवेश
– करोना बाधित क्षेत्रातील कामगार, दुकानदारांना बाजारात प्रवेश दिला जाणार नाही
– मास्क लावणे, दुकानांमध्ये सॅनिटायझर ठेवणे बंधनकारक
– प्रवेशद्वारावर सर्व बाजार घटकांचे थर्मल स्कॅनिंग

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.