नागपुरातील बहुचर्चित भुपेंद्रसिंग हत्याकांडाचा पर्दाफाश; चार कुख्यात गुन्हेगार अटकेत

नागपूर – नागपूरमधील भुपेंद्रसिंग उर्फ बॉबी माकन यांच्या बहुचर्चित हत्याकांडाचा पर्दाफाश करण्यात अखेर पोलिसांना यश आले आहे. बॉबी यांचे 25 एप्रिल रोजी अपहरण झाले होते. त्यानंतर दुस-या दिवशी त्यांचा मृतदेह नागपूर जिल्ह्यातील कोंढाळी पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका पुलाच्या खाली आढळून आला होता.

या अपहरण आणि खून प्रकरणाचा पोलिसांना अखेर झडा लागला आहे. आतापर्यंत पोलिसांनी या प्रकरणात चार कुख्यात गुन्हेगारांना अटक केली आहे. यामध्ये शैलेंद्र उर्फ लिटिल सरदार लोहिया, गुरमितसिंग उर्फ बाबू खोकर, हरजीतसिंग उर्फ सिट्टू गौर, मनिंदरसिंग उर्फ हनी चंडोक यांना गजाआड केले आहे. मनजीत वाडे नावाचा पाचवा आरोपी फरार झाला आहे.

या हत्याकांडामागचे मुख्य कारण गुन्हेगारांमधील आपापसातील संघर्ष असल्याचे तपासात समोर आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 2017 मध्ये या हत्या प्रकरणाचा मुख्य आरोपी शैलेंद्र उर्फ लिटिल सरदार गुरुचरण लोहिया याच्यावर त्याच्याच ऑफिस बाहेर फायरिंग झाली होती. ती फायरिंग मृतक बॉबीने केली असल्याचा संशय होता.

या शिवाय फरार आरोपी मनजीतसिंग वाडे याच्या ऑफिसमध्ये चालणाऱ्या रमी क्‍लबमध्ये मृतक बॉबीच्या सांगण्यावरून पोलिसांनी रेड केल्याचा त्याला संशय होता. याच रागातून आरोपींनी सुरुवातीला बॉबीचे अपहरण केले आणि त्यानंतर त्याची हत्या केली असल्याची माहिती समजते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.