लोणावळ्यातील विविध विकासकामांचे राज्यमंत्री भेगडे यांच्या हस्ते भूमिपूजन

लोणावळा  – नांगरगाव-भांगरवाडी उड्‌डाणपुलाचे भूमिपूजन राज्याचे कामगार आणि पुनर्वसन राज्यमंत्री तसेच जिल्ह्याचे सहपालकमंत्री संजय ऊर्फ बाळा भेगडे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी मावळचे खासदार श्रीरंग बारणे उपस्थित होते.

सुमारे 20 कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या या उड्‌डाणपुलासोबतच सहा कोटी 60 रुपये खर्चून बांधण्यात येणारी कैलास स्मशानभूमी आणि इतर संकीर्ण कामे, 3 कोटी 55 लाख रुपये खर्चून आशीर्वाद हॉस्पिटल पुढे बांधण्यात येणार शॉपिंग कॉम्प्लेक्‍स आणि 73 लाख रुपये खर्चून भूमिगत केबल टाकून उभारण्यात येणाऱ्या “स्ट्रीट पोल’च्या कामाचा शुभारंभ राज्यमंत्री भेगडे यांच्या हस्ते झाला. यावेळी भेगडे म्हणाले की, शहराचा विकास हा सत्ताधारी आणि प्रशासन यांच्या समन्वयातून होत असतो, याचा प्रत्यय लोणावळ्यात येत आहे.

पुरेसा निधी असला तरच शहराचा, गावाचा विकास होतो, असे नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांनी या वेळी नमूद केले. तसेच गेल्या 25 वर्षांत मिळाला नाही, एवढा निधी मागील दोन वर्षांत राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या माध्यमातून मिळाल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, मुख्याधिकारी सचिन पवार, भाजपचे गटनेते देविदास कडू, विरोधी गटनेत्या शादान चौधरी, नगरपरिषदेच्या सर्व समित्यांचे सभापती, नगरसेवक, नगरसेविका आणि लोणावळेकर नागरिक उपस्थित होते. दरम्यान लोणावळा नगरपरिषद कर्मचारी आणि अधिकारी यांच्या वतीने पूरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये तीन लाख रुपयांचा धनादेश राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्याकडे सुपूर्द केला.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×