नवी दिल्ली : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते अयोध्येत आज राम मंदिराच्या गाभाऱ्याचे भूमिपूजन होत आहे. गाभाऱ्याच्या पहिल्या शिळेचे मंत्रोच्चारासह योगींच्या हस्ते पूजन करण्यात आले. या भूमिपूजनासह मंदिराच्या निर्मितीचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे.
राम मंदिराच्या पहिल्या टप्प्यात मंदिराच्या चबुतऱ्याचे बांधकाम करण्यात आले आहे. योगी आदित्यनाथ यांनी आज आधी हनुमान गढी येथे येऊन प्रथम दर्शन घेतले आणि मग राम मंदिर गाभाऱ्याची पहिली शिळा ठेवली.
या गाभाऱ्याचे काम डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण होईल असे सांगितले जात आहे. तसेच २०२४ मधील मकरसंक्रातीला प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची या गाभाऱ्यात प्राणप्रतिष्ठा होणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
Ayodhya: CM Yogi lays foundation stone of Ram Mandir’s ‘Garbha Griha’
Read @ANI Story |https://t.co/TsG3Lk9mJH#YogiAdityanath #Yogiji #RamMandir #CMYogiAdityanath #GarbhaGriha pic.twitter.com/pZv5ujQ8sa
— ANI Digital (@ani_digital) June 1, 2022
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने ९ नोव्हेंबर २०१९ रोजी राम मंदिराबाबतचा निकाल दिला. त्यानंतर ५ ऑगस्ट २०२० ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम मंदिराच्या कामाचे भूमिपूजन केले होते. त्यानंतर पहिल्या टप्प्यात मंदिराच्या चबुतऱ्याचे काम झाले आणि दुसऱ्या टप्प्यात जवळपास दीड वर्षांनी राम मंदिराच्या गाभाऱ्याची पहिली शिळा ठेवली जात आहे. २०२४ मध्ये लोकसभा निवडणूक असणार आहे. या पार्श्वभूमीवर हे काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केला जात असल्याचेही बोलले जात आहे.