साताऱ्यातील विकासकामांचे भूमिपूजन म्हणजे सत्ताधाऱ्यांची नौटंकी

ये जो पब्लिक है सब जानती है; शिवेंद्रराजेंचा उदयनराजेंना टोला

सातारा -सातारच्या कानाकोपऱ्यात विकासकामांचे नारळ फुटत आहेत. त्यानिमित्ताने फ्लेक्‍सबाजी होत आहे, त्या खर्चातून शहरातील एखाद्या गटाराचे किंवा रस्त्याचे काम झाले असते. बोगस बिले, मर्जीतले ठेकेदार आणि विकासकामे मात्र काहीच नाहीत.

सत्ताधाऱ्यांनी गेल्या पाच वर्षांत बहुमताच्या जोरावर “नौटंकी’ केली. काही लोक रस्त्यावर बाइक चालवतात. त्यापेक्षा पाच वर्षे पालिका नीट चालवली असती, तर बरे झाले असते, असा टोला आ. शिवेंद्रसिंहराजेंनी खा. उदयनराजेंना नाव न घेता लगावला.उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शंभर बेडच्या हॉस्पिटलची घोषणा सातारा दौऱ्यात केली होती.

हे हॉस्पिटल जुन्या दवाखान्याच्या (शाही मशिदीजवळ) जागेत सुरू करण्याच्या मागणीचे निवेदन शिवेंद्रराजेंनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले. त्याची माहिती प्रसारमाध्यमांना देण्याच्या निमित्ताने त्यांनी राजकीय टोलेबाजी केली. ते म्हणाले, विकासकामांच्या भूमिपूजनासाठी काही लोक दुचाकीवरून गेल्याचे समजले. विकासाच्या नावाखाली सत्ताधाऱ्यांनी केवळ नौटंकी केली. दुचाकी चालवण्यापेक्षा पाच वर्षे पालिका व्यवस्थित चालवायला हवी होती.

आता पालिकेची निवडणूक जवळ आल्याने सत्ताधारी सातारकरांना भुलवण्याचा उद्योग करत आहेत. दुसऱ्यांच्या कामांवर जाऊन फोटोसेशन करायचे आणि सगळी कामे आम्हीच केल्याचे सांगायचे; परंतु “ये जो पब्लिक है वो सब जानती हे’, हे निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना समजणारच आहे. पालिकेत सत्ताधाऱ्यांनी बहुमताच्या जोरावर बेकायदेशीर कामे केली आहेत.

त्यांची जिल्हाधिकाऱ्यांनी सखोल चौकशी करावी. दरम्यान, शिवेंद्रराजेंनी नगराध्यक्षांचे विशेष अभिनंदन केले. त्यांच्या पत्रिकेतील ग्रह चांगले आहेत. मागील नगराध्यक्षांप्रमाणे त्यांना रजेवर पाठवले नाही, हे नशीब. ग्रेड सेपरेटर प्रेक्षणीय स्थळ म्हणून जाहीर करा, अशी टोलेबाजी त्यांनी केली.

जिल्हा बॅंकेत रामराजे निर्णय घेणार
जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीबाबत विचारले असता, शिवेंद्रराजे म्हणाले, पक्षीय राजकारण बाजूला ठेऊन आम्ही पाच वर्षे बॅंक चांगली चालवली. केवळ संचालक म्हणून निवडून येण्यात अर्थ नाही. त्यांचा उपयोग बॅंकेला व्हायला हवा. तडजोडीसाठी उदयनराजेंकडून प्रस्ताव आला तर काय, या प्रश्‍नांवर ते म्हणाले, अंतिम निर्णय रामराजे घेणार आहेत. त्यावर मी आताच भाष्य करणार नाही; परंतु चर्चेसाठी उदयनराजे यांचा मला फोन आलेला नाही आणि येईल अशी परिस्थिती सध्या नाही.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.