प्रशांत ढावरे
लोणंद- लोणंद पोलिस ठाण्याच्या हद्दीत तरडगावजवळ भुरकवाडी येथे रविवारी दि २२ रोजी संध्याकाळी सहाच्या सुमारास आशीबाई रमेश भोसले व नमन्या हचल पवार या भावंडांचा भाल्याने भोकसून खून करण्यात आला आहे .
लोणंद पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, मौजे भुरकरवाडी गावच्या हद्दीत फिर्यादी छाया नमन्या पवार यांच्या राहत्या घराजवळ नमन्या पवार व त्याची बहीण आशीबाई रमेश भोसले हे गप्पा मारत बसले असताना तेथे चारचाकी गाडीतून आलेल्या गबऱ्या रमेश भोसले, अरूण झबझब्या पवार, संपूबाई गबऱ्या भोसले, चोच्या राज्या शिंदे, शबनम राज्या शिंदे यांनी चोरीचा आळ घेताय या कारणावरून चिडून हाताने, लाथा बुक्यांनी मारहाण केली. तसेच त्यांच्यातील गबऱ्या रमेश भोसले याने त्याच्या हातातील भाल्याने आशीबाई भोसले हिच्या गळ्यावर व नमन्या पवार याच्या पोटात भोकसून गंभीर जखमी करून त्यांचा खून केला आहे, अशी फिर्याद छाया पवार यांनी रात्री ऊशीरा लोणंद पोलिस ठाण्यात दिली आहे.
घटनेची माहिती मिळताच लोणंद पोलिस ठाण्याचे सपोनि संतोष चौधरी यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळाला तातडीने भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. तसेच या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन उपअधीक्षक महामुनी यांनीही घटनास्थळाला भेट देऊन तपासाबाबत सूचना दिल्या. या घटनेचा तपास लोणंद पोलिस ठाण्याचे सपोनि संतोष चौधरी करत आहेत.