62 कोटींच्या फसवणुकीचा ठपका
पुणे – भाईचंद हीराचंद रायसोनी पतसंस्थेतील घोटाळाप्रकरणी डेक्कन पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी न्यायालयात पहिले दोषारोपपत्र सादर केले. पाच संशयितांविरुद्ध 2,500 पानांचे हे दोषारोपपत्र आहे. यात 61 कोटी 90 लाख 88 हजार 163 रुपयांची फसवणूक, अपहार केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.
सीए महावीर जैन, विवेक ठाकरे, धरम सांखला, कमलाकर कोळी व सुजीत वाणी यांच्याविरुद्ध दोषारोप आहे. यातील कमलाकर कोळी हा जामिनावर असून, इतर चौघे येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत.
या प्रकरणात डेक्कन पोलीस ठाण्यात रंजना घोरपडे यांच्या फिर्यादीवरुन दाखल गुन्ह्यात पोलिसांनी 89 व्या दिवशी तपास पूर्ण करुन अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. एस. गोसावी यांच्या न्यायालयात दोषारोप सादर केले. यावेळी सरकारी वकील प्रवीण चव्हाण, आर्थिक गुन्हे शाखेच्या उपायुक्त भाग्यश्री नवटके, पोलिस निरीक्षक सुचिता खोकले, त्रयस्थ अर्जदार ऍड. अक्षता नायक उपस्थित होते. दि.27 नोव्हेंबर रोजी जळगावात छापेमारी करुन महत्त्वाची कागदपत्रे, पुरावे, संगणक जप्त करुन सहा संशयितांना अटक केली.
यानंतर 22 जानेवारी रोजी मुख्य संशयित सुनील झंवर याचा मुलगा सूरज यालाही अटक केली आहे. संबंधितांनी ठेविदारांच्या पावत्यांमध्ये 15 ते 35 टक्के रक्कम घेऊन बेकायदेशीरपणे पावत्या मॅचिंग केल्या. बीएचआरमधील कर्जदारांचा कसा फायदा होईल, यासाठी काम केले. यात ठेवीदारांचे आर्थिक नुकसान झाल्याचे दोषारोपात म्हटले आहे.