पुणे – बीएचआर फसवणूक व अपहार प्रकरणात पुणे आर्थिक गुन्हे शाखेने गुरुवारी पुन्हा जळगाव शहर, जामनेर, पाळधी, भुसावळ, औरंगाबाद, धुळे, मुंबई, अकोला, पुणे या सहा जिल्ह्यात ऐकाच वेळी छापेमारी करत तब्बल बारा जणांना ताब्यात घेतले.
जळगाव शहरातून मद्य व्यावसायिक भागवत भंगाळे यांना मॉर्निंग वॉक करताना पोलिसांनी सहा वाजता तब्यात घेतले तर भुसावळ येथे माजी उपनगराध्यक्षाला ही ताब्यात घेण्यात आलेले आहे. या प्रकरणी डेक्कन, पिपंरी आणि पुणे ग्रामीण पोलिसांमध्ये गुन्हे दाखल आहेत.
पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता व आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिस उपायुक्त भाग्यश्री नवटके यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. यापुर्वी देखील अनेकांना संबंधीत प्रकरणात पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
भागवत भंगाळे (जळगाव), छगन झालटे (जामनेर) जितेंद्र रमेश पाटील (जामनेर), आसिफ मुन्ना तेली (भुसावळ), जयश्री शैलेश मनियार (जळगाव), संजय तोताळा (जळगाव), राजेश लोढा (जामनेर), प्रितेश चंपालाल जैन (धुळे), अंबादास आबाजी मानकापे (औरंगाबाद), जयश्री अंतिम तोतला (मुंबई), प्रेम नारायण कोवगता (जळगाव), प्रमोद किसनराव कापसे (अकोला) अशी ताब्यात घेण्यात आलेल्यांची नावे आहेत.
दरम्यान पतसंस्थेमध्ये अवसायक जितेंद्र कंडारे व त्याच्या साथीदारांनी केलेल्या गैरव्यवहाराचे पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने तब्बल एक ट्रक भरुन पुरावे यापुर्वी गोळा केले आहेत. त्यात प्रामुख्याने जळगावमधील वेगवेगळ्या ठिकाणी टाकलेल्या धाडीत मिळालेली कागदपत्रे, शपथपत्रे, तसेच लॅपटॉप, पीसीओसह मोठ्या प्रमाणावर डिजिटल साहित्यही हस्तगत करण्यात आले आहेत. याबरोबरच औरंगाबाद व अन्य ठिकाणी केलेल्या तपासणीतअनेक महत्वपूर्ण कागदपत्रे पोलिसांच्या हाती लागली आहेत.त्यानुसार पोलिसांनी कारवाईचा धडाका लावला असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
बीएचआर प्रकरणी पुणे पोलिसांनी एकाचवेळी जळगाव, औरंगाबाद, पुणे, धुळे अशा सहा जिल्ह्यात छापे टाकून बारा जणांना ताब्यात घेतले असून, पुढील कारवाई सुरू आहे.
भाग्यश्री नवटके, पोलिस उपायुक्त आर्थिक गुन्हे व सायबर