- विलास लांडे राष्ट्रवादीचे पुरस्कृत उमेदवार
पिंपरी – भोसरी विधानसभा मतदार संघातून पुन्हा एकदा आमदार महेश लांडगे विरुद्ध माजी आमदार विलास लांडे यांच्यात लढत रंगणार आहे. भाजप-शिवसेना महायुतीकडून महेश लांडगे य़ांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केला. तर विलास लांडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे पुरस्कृत उमेदवार म्हणून अर्ज भरला. आघाडीचा उमेदवारच नसल्याची विचित्र परिस्थिती या मतदार संघात निर्माण झाली आहे.
एकेकाळी गुरु-शिष्य असलेले लांडे व लांडगे हे मागील विधानसभा निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात होते. त्य़ावेळी विलास लांडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर उभे होते. तर महेश लांडगे यांनी अपक्ष निवडणूक लढवत लांडे यांच्या राजकीय सद्दीला हादरा दिला. राजकीय कुरघोड्यांमुळे नेहमी चर्चेत असणाऱ्या भोसरी विधानसभेतील यावेळच्या लढतीबाबत शहरवासियांना उत्कंठा होती.
महायुतीचे उमेदवार म्हणून भाजपने सहयोगी सदस्य असलेले महेश लांडगे यांना उमेदवारी दिली. राष्ट्रवादी काँग्रेसकडून विलास लांडे यांना उमेदवारीसाठी गळ घातली जात होती. मात्र, लांडे यांनी उमेदवारी नाकारली. आज उमेदवारी अर्ज दाखल होण्याच्या अखेरच्या दिवशीही आघाडीचा उमेदवार जाहीर होत नसल्याने कार्यकर्ते बुचकळ्यात पडले होते. अखेर राष्ट्रवादी काँग्रेसने विलास लांडे यांना पुरस्कृत केले. महेश लांडगे यांच्या विरोधातील सर्वपक्षीयांची मोट बांधण्यासाठी घडाळ्याच्या चिन्हाचा अडसर नको म्हणून लांडे यांना पुरस्कृत करण्याची खेळी करण्यात आल्याचे समजते.
भाजपच्या विधी समिती सभापती रुपाली बोबडे यांचे पती माजी नगरसेवक भीमा बोबडे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरत बंडाचा झेंडा फडकाविला आहे. 7 ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी मुदत असल्याने अखेरपर्यंत रिंगणात कोण राहणार याबाबत उत्सुकता आहे.