पिंपरी (प्रतिनिधी) – आता भोसरी विधानसभेची निवडणूक ही माझ्या एकट्याची राहिलेली नाही. ही निवडणूक सर्व भोसरीकरांनी हाती घेतलेली आहे. त्यामुळे आता आपला विजय कोणी रोखू शकत नाही असा विश्वास हजारो नागरिकांच्या साक्षीने श्री. वाघेश्वर महाराजांच्या दरबारात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार अजित गव्हाणे यांनी व्यक्त केला.
महाविकास आघाडीतर्फे भोसरी मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अजित गव्हाणे यांच्या प्रचाराचा शुभारंभ चऱ्होली येथील श्री वाघेश्वर महाराज मंदिरामध्ये श्रीफळ वाढवून करण्यात आला. यावेळी भोसरीचे ग्रामस्थ तसेच चऱ्होली, डुडुळगाव, वडमुखवाडी तसेच आजूबाजूच्या वाड्यावस्त्यांवरील हजारो नागरिक उपस्थित होते. यावेळी राष्ट्रवादीचे नेते माजी आमदार जगन्नाथ बापू शेवाळे, ज्येष्ठ नेते तथा राष्ट्रवादीचे नेते प्रकाश आप्पा म्हस्के, माजी आमदार विलास लांडे, माजी नगरसेविका विनया तापकीर, किसन महाराज तापकीर, प्रदीप आबा तापकीर, घनश्याम खेडकर, कुणाल तापकीर,पोपट पठारे, दत्ताभाऊ बुर्डे, रमेश गिलबिले, सुनील तात्या पठारे, आप्पासाहेब भोसले, प्रमोद काळजे, सोपान गिलबिले आदी उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष शिवसेना (उबाठा) काँग्रेस तसेच इतर पक्षातील महत्त्वाचे पदाधिकारी आजी माजी कार्यकर्ते माजी नगरसेवक उपस्थित होते.
श्री वाघेश्वर महाराजांच्या चरणी श्रीफळ वाढवल्यानंतर अजित गव्हाणे म्हणाले, भोसरी विधानसभेच्या विकासासाठी शिवसेना, काँग्रेस तसेच इतर घटक पक्षांनी दिलेली साथ महत्त्वाची आहे. आगामी काळात भोसरी मतदारसंघांमध्ये प्रकल्प प्रत्यक्षात उतरतील ते कागदावर राहणार नाही. त्याची बॅनरबाजी होणार नाही याची मी ग्वाही देतो. भोसरीकरांनी परिवर्तनासाठी जो संघर्ष उभारला आहे त्या संघर्षाला कुठेही गालबोट लागणार नाही हे मी वाघेश्वर महाराजांच्या साक्षीने सांगतो. आज इथे जमलेला प्रत्येक व्यक्ती, परिवर्तनासाठी पुढाकार घेतलेला प्रत्येक जण उमेदवार आहे. संपूर्ण गावाने संघर्षाची भूमिका भैरवनाथ महाराजांच्या साक्षीने घेतली आहे. गेली वीस वर्ष नगरसेवक म्हणून काम पाहिले. स्थायी समितीचे अध्यक्ष म्हणून काम करताना केंद्र व राज्यातील निधी महापालिकेला मिळवून दिला त्यातून महत्त्वाचे प्रकल्प शहरात मार्गी लावले.
पिंपरी चिंचवड शहरामध्ये गेल्या अडीच वर्षापासून प्रशासकीय राजवट आहे. अनेक महापालिकांची तर पाच वर्षे संपली मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अद्यापही झालेल्या नाहीत. आपल्या विचारांचे सरकार आल्यानंतर तातडीने महापालिका निवडणुका होतील. यासाठी प्रत्येक उमेदवाराकरिता ताकदीने लढणे आवश्यक आहे असे अजित गव्हाणे म्हणाले.
Maharashtra Election 2024: राज्यात आता 8272 उमेदवार रिंगणात, अखेरच्या दिवशी 983 जणांची माघार
वस्ताद एक डाव राखून ठेवतो….!
वस्ताद एक डाव राखून ठेवतो…याची प्रचिती आज अजित गव्हाणे यांच्या प्रचाराचा शुभारंभ करताना आली. माजी आमदार विलास लांडे यांच्या पुढाकारातून जुन्या जाणत्या पदाधिकाऱ्यांची टीम आज प्रचाराच्या शुभारंभ प्रसंगी उपस्थित होती. गेली 40 वर्ष ज्यांनी राजकारणात घालवली आहे अशा पदाधिकाऱ्यांची उपस्थिती बरेच काही सांगून गेले. जिल्हा बँका, विविध कार्यकारी सोसायटी आणि सहकार क्षेत्रातील संस्था यांचे पदाधिकारी यावेळी अजित गव्हाणे यांच्या पाठीशी उभे असलेले पहायला मिळाले.