भोसरी, दि. 6 (प्रतिनिधी) -अधिकारी सुट्टीवर असल्याने थेट सह दुय्यम निबंधक कार्यालय बंद ठेवण्याचे धक्कादायक प्रकार सातत्याने घडत आहेत. त्यामुळे हे सरकारी कार्यालय आहे की खासगी व्यवसाय? असा संतप्त सवाल स्थानिक नागरिक उपस्थित करू लागले आहेत. नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाचे भोसरी, लांडेवाडी येथील सह दुय्यम निबंधक हवेली क्रमांक 14 या कार्यालयातील सब रजिस्टार गेल्या दोन महिन्यांपासून वैद्यकीय रजेवर आहेत. त्यामुळे दस्त नोंदणीचे काम ठप्प झाले असून नागरिकांची गैरसोय होत आहे. तसेच शासनाचा महसूलदेखील बुडत आहे. त्यामुळे भोसरीतील दुय्यम निबंधक कार्यालय सुरू करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.
सह दुय्यम निबंधक हवेली क्रमांक 14 कार्यालयात स्थावर मालमत्ता खरेदी, विक्री, मुद्रांक शुल्क भरण्याचे व्यवहार होतात. भोसरी, दिघी, मोशी, चऱ्होली, बोपखेल, चोवीसावाडी, डूडळगाव, चिखली आदी परिसरासाठी दस्त नोंदणीसाठी हे एकच कार्यालय आहे. अनेक भागांतून तसेच पंचक्रोशीतून नागरिक व वकील दस्त नोंदणीसाठी येतात. मात्र, सुमारे दोन महिन्यांपासून ते बंद असल्याने खरेदी खत, साठेखत, कुलमुखत्यार पत्र, बक्षीस पत्र, मृत्यू पत्र आदींसह इतर दस्त नोंदणी करण्यासाठी येणाऱ्यांची गैरसोय होत आहे.
सह दुय्यम निबंधक हवेली क्रमांक 14 मधील अधिकारी शस्त्रक्रियेमुळे वैद्यकीय रजेवर आहेत. त्यांच्या जागेवर काम करण्यासाठी अधिकारीच उपलब्ध नसल्याने ते गेल्या दोन महिन्यांपासून बंद आहे. हे कार्यालय खासगी मालकीच्या भाड्याच्या जागेवर आहे. सुमारे दोन वर्षांचे भाडे थकल्याने जागा मालकाने या कार्यालयाला काही महिन्यांपूर्वी टाळे लावले होते. आता पुन्हा अधिकारीच मिळत नसल्याने टाळे लागले आहे. त्यामुळे नागरिक व वकिलांची गैरसोय होत आहे. हे कार्यालय तातडीने सुरू करण्याची मागणी होत आहे.
या कार्यालयात सब रजिस्टर यांचा मनमानी कारभार सुरू आहे. वर्षातून कार्यालय जास्त दिवस बंदच असते. अधिकाऱ्यांच्या हेकेखोर भूमिकेमुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. साहेब म्हणतील त्यावेळेस कार्यालय उघडले जाते. आम्हा सर्वांना हा प्रश्न पडला आहे की, कार्यालय सरकारी आहे की खासगी? आयजीआर व जेडीआर साहेबांना वकिलांचे शिष्टमंडळ जाऊन भेटले आहे. त्यांनी कार्यालय लवकरच सुरू करण्याचे आश्वासन दिले आहे. – नितीन तिडके, ऍडव्होकेट
सह दुय्यम निबंधक हवेली क्रमांक 14 मधील सब रजिस्टार हे शस्त्रक्रियेमुळे गेल्या दोन महिन्यांपासून वैद्यकीय रजेवर आहेत. पुढील आठवड्यात ते रूजू होतील व कामकाज सुरळीत होईल.
– श्रावण हार्डिकर, नोंदणी महानिरीक्षक.