भोर – राजगड पोलिस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदे करणाऱ्यांवर कडक कारवाईची मोहीम उघडली आहे. छुपे अवैध धंदे करणाऱ्यांची नावे राजगड पोलीस ठाण्यात द्यावी. त्यांच्यावर कडक कारवाई करू. तसेच महिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवले जाईल, असे प्रतिपादन राजगड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांनी केले.
राजगड पोलीस स्टेशनने दिलेल्या माहितीनुसार, दराडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी करंदी खेडेबारे (ता. भोर) या गावच्या हद्दीमध्ये ओढ्यालगत सुरू असलेली दारूची भट्टी उद्धवस्त केली. करंदी खेडेबारेच्या हद्दीत जितेंद्र उर्फ गुंगा कुंभार हा गावठी दारूचे तयार करत असल्याची माहिती राजगड पोलिस ठाण्याला मिळाली. तातडीने राजगड पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक दत्तात्रय दराडे व त्यांच्या पथकाने त्या ठिकाणी छापा टाकला. व तेथील दारूअड्डा उद्धवस्त केला.
या ठिकाणी एक हजार लिटर पाण्याची टाकी, दोन हजार लिटर रसायन, दारू तयार करण्याचे साहित्य, मुद्देमाल जाळून नष्ट करण्यात केला. याबाबत जितेंद्र उर्फ गुंग्या कुंभार याच्यावर गुन्हा दाखल केला. पोलिसांनी केलेल्या कारवाईबाबत करंदी व पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी स्वागत करून अभिनंदन केले आहे. पुढील तपास पोलीस हवालदार नितीन रावते करत आहेत.