सातत्यपूर्ण कामकाजात भोर पंचायत समिती “अव्वल’

बीडीओ विशाल तनपुरे, डॉ. सूर्यकांत कऱ्हाळे यांचे नियोजनबद्ध काम

भोर तालुक्‍यात एप्रिलच्या मध्यावर करोनाचा पहिला रुग्ण आढळल्याने रुग्णांची संख्या वाढतच गेली. रुग्णसंख्या आटोक्‍यात आणण्यात किंबहुना तालुका करोनामुक्‍तीकडे नेण्यासाठी भोर पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी अहोरात्र काम केले आहे. पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विशाल तनपुरे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सूर्यकांत कऱ्हाळे यांच्यासह दक्ष अधिकारी, कर्मचाऱ्यांनी प्रशासन आणि नागरिकांमध्ये समन्वयाचा सेतू बांधत भोर तालुका साथीच्या विळख्यातून बाहेर काढला. त्यामुळे भोर पंचायत समितीच्या पारदर्शक आणि सातत्यपूर्ण यशस्वी कामगिरीचा लॉकडाऊन आणि अनलॉकमधील घेतलेला आढावा…

भोर पंचायत समितीस्तरावरून तालुक्‍यातील 201 मुख्य गावांमध्ये दोन ते तीन गावांसाठी एक प्रभारी अधिकारी म्हणून ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहाय्यकांची नेमणूक केली. प्रभारी अधिकाऱ्यांनी गावात बाहेरून आलेल्या व्यक्‍तींची यादी, त्यांना होम क्‍वारंटाइन करणे, देखरेख, आदी उपायांची अंमलबजावणी करण्यात आली.

10 गावांसाठी एक क्षेत्रीय अधिकारी म्हणून विस्तार अधिकारी, शाखा अभियंता, मंडलाधिकारी, महसूल व कृषी अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली. त्यांनी संबंधित गावातील प्रभारी अधिकाऱ्यांशी समन्वय साधून करोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी केली.

लॉकडाऊनमध्ये दैनंदिन गरजा व इतर जीवनावश्‍यक सुविधांसाठी प्रत्येक गावातील ग्रामदूत कार्य महत्त्वाचे ठरले. 30 ठिकाणी नाकाबंदीसाठी 24 तास कार्यरत असणारी तपासणी पथके नेमली. शिक्षकांसोबत काही निवडक नाक्‍यासाठी होमगार्डची नियुक्‍ती करण्यात आली.

लॉकडाऊनच्या काळात बाहेरगावावरून येणाऱ्या लोकांसाठी तालुक्‍यातील तीन महाविद्यालयांमध्ये सुमारे 500 बेडची आणि प्रत्येक गावामध्ये जिल्हा परिषद शाळा, अंगणवाडी शाळा या ठिकाणीही संस्थात्मक विलगीकरणाची सोय केली होती. होम क्‍वारंटाइन केलेल्या व्यक्‍तींना कोणतेही करोनासदृश लक्षण दिसल्यास तात्काळ वैद्यकीय अधिकाऱ्यांनी भेट दिली. त्यांची तपासणी करण्यात आली.

जिल्हा परिषदेने समूह आरोग्य अधिकारी, कंत्राटी आरोग्यसेविका, वॉर्ड बॉय, वैद्यकीय अधिकारी, फार्मासिस्ट, लॅब-टेक्‍निशियन आदी मनुष्यबळ उपलब्ध करून दिले. कोविड केअर सेंटर व उपजिल्हा रुग्णालयात सेवा दर्जेदार उपलब्ध करता आल्या.

करोनापासून संरक्षण करण्यासाठी जनजागृती करण्यात आली. ग्रामसेवक, आशा कार्यकर्ती, आरोग्यसेवक, अंगणवाडीसेविका, मदतनीसमार्फत गृहभेटी, सर्व गावांत निर्जंतुकीकरणासाठी फवारणी चारवेळा करण्यात आली. तालुक्‍यातील सर्व कुटुंबांना ग्रामपंचायतींनी हॅण्डवॉश किंवा सॅनिटायझरचे वाटप केले.

बाधित आढळल्यानंतर त्या गावात प्रत्यक्ष भेटी देऊन रुग्णाच्या संपर्कातील तीव्र जोखीम व कमी जोखीम व्यक्‍तींची यादी करण्यात आली. यापैकी तीव्र जोखीम व्यक्‍तींची कोविड चाचणी करण्यात आली. कमी जोखीम व्यक्‍तींना गृह विलगीकरणात ठेवले. सर्व गावांमधील सर्व कुटुंबांचे तात्काळ सर्वेक्षण करीत तपासणी केली. तालुक्‍यात 4 ठिकाणी एकूण 400 रुग्णांची क्षमता असलेले अद्ययावत सुविधायुक्‍त, असे कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले.

उपजिल्हा रुग्णालयात डेडीकेटेड कोविड हेल्थ सेंटर तयार करण्यात आले. नसरापूरमध्ये सिद्धिविनायक हॉस्पिटलला कोविड हॉस्पिटल म्हणून घोषित करण्यात आले. कोविड केअर व डेडीकेटेड कोविड हेल्थ सेंटर याठिकाणी सुविधांवर देखरेख ठेवण्यासाठी इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्‍ती करण्यात आली.

आरोग्य पथके 24 तास कार्यरत ठेवले. बऱ्याच रुग्णांनी कोविड केअर सेंटरमध्ये चांगल्या सुविधा मिळाल्याबाबत स्वयंस्फूर्तीने अभिप्राय नोंदविले आहेत. पंचायत समिती उपकर निधीतून आशा कार्यकर्ती, अंगणवाडी सेविका व मदतनीसांना स्वसरंक्षणासाठी मास्क व सॅनिटायझरचे वाटप केले. पाच प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांना एकूण 50 पीपीई किटचे वाटप केले. जिल्हा परिषदेमार्फत सर्व कर्मचाऱ्यांना 1 कोटीचे विमा संरक्षण दिले होते. सर्व कर्मचाऱ्यांसाठी 50 लाखांचे विमा संरक्षण जाहीर केले.

विम्याचा लाभ शिंदेवाडी ग्रामपंचायत कर्मचाऱ्याच्या कुटुंबीयांना मिळाला. आशा कार्यकर्ती, आरोग्य कर्मचारी, अंगणवाडीसेविका, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना प्रत्येकी 1 हजार रुपये प्रोत्साहनपर भत्ता दिल्यामुळे हा घटक समाधानी राहिला आहे. त्यामुळे तालुक्‍यात जनजीवन पूर्वपदावर आले आहे. यात सहायक गटविकास अधिकारी कुलदीप भोंगे, तत्कालीन गटशिक्षणाधिकारी के. डी. भुजबळ, विस्तार अधिकारी, बांधकाम विभागाचे शाखा अभियंता, सर्व कर्मचारी, सामाजिक संस्थांची साथ लाखमोलाची ठरली आहे.

रुग्णवाहिका ठरल्या जीवनदूत
कोविड संसर्गाच्या कालावधीत रुग्णवाहिकांची उपलब्धता कमी होती. तालुक्‍यासाठी एकच रुग्णवाहिका असल्याने रुग्णांना रुग्णवाहिकेची वाट पाहावी लागत होती. त्यावर गटविकास अधिकारी विशाल तनपुरे यांनी तालुक्‍यातील ग्रामपंचायतींच्या सर्व सरपंचांची बैठक आयोजित केली. यात ग्रामपंचायतींना प्राप्त 14व्या वित्त आयोगातील आरोग्य सुविधेवर करावयाच्या खर्चातील तरतुदीतून रुग्णवाहिका खरेदीचा प्रस्ताव ठेवला. त्यास सर्व सरपंचांनी प्रतिसाद दिला. त्यातून 5 आरोग्य केंद्रांना रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आल्या. रुग्णवाहिका खरेदीसाठी नियोजनाची अंमलबजावणी संपूर्ण जिल्ह्यात करण्यात आली. नागरिकांसाठी तात्काळ उपायासाठी पंचायत समिती कार्यालयात तालुका नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली. सर्व पदाधिकारी व पत्रकारांचे सहकार्य प्रशासनाचा उत्साह वाढविणारा ठरला.

कुटुंबांचे सर्वेक्षण
तालुक्‍यातील पाचही प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येणाऱ्या सर्व गावांतील सर्व कुटुंबांचे सर्वेक्षण करण्यासाठी आशा कार्यकर्ती, अंगणवाडीसेविका, अंगणवाडी मदतनीस, प्राथमिक शिक्षक यांची नेमणूक करण्यात आली. “माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या अभियानाद्वारे संपूर्ण गावाचे सर्वेक्षण एकाच दिवसात करून संशयित रुग्णांची तपासणी केल्याने संभाव्य प्रादुर्भाव आटोक्‍यात आला.

गरजूंना जीवनावश्‍यक साहित्य वाटप
तालुक्‍यातील सर्व प्रशासकीय अधिकारी, शिक्षक संघ, ग्रामसेवक संघटना, महसूल संघटना, पंचायत समिती कर्मचारी, दानशूर व्यक्‍ती व विविध कंपनीमार्फत तालुक्‍यातील गरजू कुटुंबांना जीवनावश्‍यक साहित्यांचे किट वाटप करण्यात आले. जिल्हा परिषदेमार्फत शरद भोजन योजनेंतर्गत निराधार अपंग व्यक्‍तींना अंगणवाडीसेविका, मदतनिसांमार्फत भोजन पुरविले.

शहरातून गावाकडे आलेल्या व इतर रेशनकार्डधारक नसलेल्या नागरिकांना शासकीय दरात धान्य उपलब्ध करून देण्यात आले. बाहेरील जिल्ह्यातील व राज्यातील मजुरांसाठी मजूर कॅम्प तयार केले. पायी चालत जाणाऱ्या मजुरांसाठी विश्रामगृह तयार केले. त्यांना प्रवासासाठी वाहन उपलब्ध करून दिल्याने त्यांनी प्रशासनाचे आभार मानले.

शब्दांकन
भुजंगराव दाभाडे
भोर तालुका प्रतिनिधी

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.