भोर- वेल्ह्यात आठ दिवस लॉकडाऊन

भोर -भोर व वेल्हा तालुक्यातील करोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी (दि. 18) आमदार संग्राम थोपटे यांच्या अध्यक्षतेखाली व भोरचे उपविभागीय अधिकारी राजेंद्रकुमार जाधव यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकित भोर व वेल्हा तालुक्यात दि. 23 जुलै ते 31 जुलै या कालावधीत लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार अजित पाटील यांनी दिली.
यावेळी भोर-वेल्हे तालुक्यात लॉकडाऊनच्या काळात भोर तालुक्यात 30, तर वेल्हे तालुक्यात 16 ठिकाणी तापासणी पथके तैनात केली जाणार आहेत. प्रशासनाच्या निर्देशित आदेशांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. नागरिकांनी लॉकडाऊनच्या कालावधीत पुरेसा व जीवनावश्यक साहित्यांचा साठा करावा व लॉकडाऊनचे पालन करावे, असे आवाहन आमदार थोपटे व प्रशासनामार्फत करण्यात आले.
भोर तालुक्यात 125 करोना बाधित रुग्ण असून, 67 जणांनी करोनावर मात केली आहे, तर 56 रुग्णांवर भोर व पुणे येथे उपचार सुरू आहेत. भोर व वेल्हे येथील उपजिल्हा रुग्णालयांना प्रत्येकी दोन व्हेंटिलेटर देण्याची प्रशासनाची मागणी आमदार थोपटे यांनी यावेळी मान्य केली. भोर उपजिल्हा रुग्णालयात 20 बेडचा एक भाग करोना रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. चेलाडी येथील सिद्धीविनायक हॉस्पिटल येथे 30 बेडची व्यवस्था केली असल्याचे उपविभागीय अधिकारी राजेंद्रकुमार जाधव सांगितले. यावेळी भोर आणि वेल्ह्यासाठी प्रत्येकी 15 लाखांच्या दोन रुग्णवाहिका देण्यात येणार असल्याचे आमदार थोपटे यांनी सांगितले.





