पिरंगुट – आजपर्यंत आपण पैलवानांना मैदानात कुस्ती करताना पाहिले; पण हेच पैलवान आता भोर विधानसभा मतदारसंघातील भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी- आरपीआय व मित्र पक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार शंकर मांडेकर यांच्याकरिता राजकीय मैदान मारण्यासाठी आखाड्यात उतरले आहेत. वस्ताद व पैलवान मंडळींनी भोर विधानसभेचे मैदान शंकर मांडेकर हेच मारणार, असा विश्वास उपस्थित पैलवानांनी यावेळी व्यक्त केला. भूकुम येथील मुक्ताई मंगल कार्यालय येथे बुधवारी सायंकाळी पैलवान मंडळींचा स्नेहमेळावा आयोजित केला होता.
यावेळी भोर, वेल्हा, मुळशीतील वस्ताद व पैलवान यावेळी छत्रपती पुरस्कार विजेते कैलास मोहोळ महाराष्ट्र चॅम्पियन बाळासाहेब बुचडे, विठ्ठलराव जांभुळकर, विजय साखरे, दत्ता मोहोळ, दिलीप भरणे, भरत किनाळे, विक्रम पवळे, विक्रम पारखी, बाबासाहेब कंधारे, संदीप वांजळे, राजू मते , बाबा चोरघे, शांताराम इंगवले, दत्ता मोहोळ, विलास भिलारे, पांडुरंग खाणेकर, किसन नांगरे, आबू माझीरे, अण्णा पवळे, दिगंबर केदारी, महेश मोहोळ, पंकज हरपुडे, भूषण शिवतरे, गणेश आबा कंधारे, समीर कोळेकर, संतोष दगडे, गोविंद आंग्रे, अमित पवळे,गणेश मारणे, प्रमोद मांडेकर, रमेश पवळे, सचिन शिंदे, मुन्ना झुंजुरके, हेमंत माझिरे, हिरामण गोडांबे, हनुमंत नांगरे, मारुती वर्पे, कैलास चोंधे, प्रकाश भेगडे, प्रकाश मातेरे, राजू तांगडे, चंद्रकांत मोहोळ आदी उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार शंकर मांडेकर म्हणाले, खेळ आणि राजकारण हे खूप वेगळे आहे. कुस्ती हा माझा खेळ आहे. खेळातील कुस्तीनंतर पैलवानांच्या ताकदीवर राजकारणातील कुस्तीही मी मारणार आहे. पैलवानांच्या समस्या मी जवळून अनुभवल्या आहेत. त्या सोडवण्यासाठी माझे प्राधान्य असते. भोर, राजगड आणि मुळशीला कुस्तीची परंपरा जुनी असून येथे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील मल्ल तयार झाले आहेत. हा पारंपरिक खेळ नव्या पिढीत रुजविण्यासाठी आणि या खेळात नवे मल्ल घडविण्याचे काम मला करायचे आहे.