अनेक प्रकल्पांच्या उद्घाटनासह महायुती विधानसभेचे रणशिंग फुंकणार
पुणे – महात्मा जोतिबा आणि सावित्रीबाई फुले यांनी मुलींची पहिली शाळा सुरू केलेल्या भिडेवाड्यातील राष्ट्रीय स्मारकाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. येत्या १६ ऑगस्ट रोजी हा कार्यक्रम पुण्यात होणार आहे. कार्यक्रमाचे ठिकाण अद्याप निश्चित झालेले नसले, तरी पंतप्रधान या वाड्याला भेट देणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली.
यानिमित्ताने पुण्यात येणाऱ्या पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत महायुतीकडून विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडला जाणार आहे. या भूमिपूजनासह स्वारगेट ते जिल्हा न्यायालय या भुयारी मेट्रो मार्ग, स्वारगेट- कात्रज मार्गाचे भूमिपूजन आणि वाघोली, तसेच चांदणी चौकापर्यंत मेट्रोच्या विस्तारीत मार्गाचे कामही यानिमित्ताने सुरू केले जाण्याची शक्यता आहे. महापालिकेच्या पूर्ण झालेल्या प्रकल्पाचे उद्घाटन, तसेच काही प्रकल्पांचे भूमिपूजन करण्याचे नियोजनही प्रशासनाकडून सुरू आहे. शासनाकडून याबाबतचे निर्देश नुकतेच महापालिकेस देण्यात आले आहेत.
असे आहे स्मारक
शिवाजी रस्त्यावरील सुमारे पावणेतीन गुंठे जागेतील भिडेवाडा मोडकळीस आला होता. तिथे स्मारक उभारण्याचा निर्णय अनेकदा घेतला गेला. मात्र, वाड्यातील भाडेकरूंनी न्यायालयात धाव घेतल्याने भूसंपादन रखडले होते. उच्च न्यायालयाने योग्य मोबदला देऊन भूसंपादन करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयानेही हेच आदेश कायम ठेवले. त्यामुळे भूसंपादनाचा मार्ग मोकळा झाल्यानंतर महापालिकेने डिसेंबर २०२३ मध्ये तातडीने हा वाडा भुईसपाट करून जागा ताब्यात घेतली. या कामासाठी सात कोटी २६ लाख ४८ हजार रुपये खर्च अपेक्षित आहे.
असे असेल स्मारक
– तत्कालिन कालसुसंगत बाह्यरूप
– तळघरात दुचाकींसाठी वाहनतळ
– वर तीन मजली बांधकाम
– फुले दाम्पत्याचे पुतळे
– फुले दाम्पत्याच्या कार्याविषयी दृकश्राव्य माहिती
– ग्रंथालय व महिला सक्षमीकरणासाठी प्रशिक्षण कक्ष