मुंबई : प्रेषित मोहम्मद यांच्याविषयी अवमानकारक विधान करणाऱ्या भाजपाच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांचे प्रकरण काही केल्या संपत नसल्याचे दिसत आहे. कारण आता त्यांच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर एक पोस्ट करणाऱ्या साद अन्सारी या व्यक्तीला भिवंडी पोलिसांनी अटक केली आहे.
साद अन्सारी याच्या पोस्टनंतर संपूर्ण शहरात तणावाचे वातावरण पसरले होते. संतप्त जमाव साद याच्या घरीही गेले होते. साद याला पोलिसांनी तात्काळ अटक केल्याने हिंसा टळल्याचे सांगण्यात येत आहे.
प्रेषित मोहम्मद यांच्याबाबत विधान करणाऱ्या नुपूर शर्मा यांच्याविरोधात मुंबई, ठाणे, भिवंडीत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यातच भिवंडीतील साद अन्सारी नावाच्या एका व्यक्तीने त्याच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर नुपूर शर्माच्या विधानाला समर्थन देणारी एक पोस्ट प्रसारित केली. त्यामुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली.
या घटनेनंतर जमाव त्याच्या घराबाहेर जमला होता. परंतु त्यापूर्वीच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले होते. साद विरोधात भिवंडी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.