मंचर -पारगाव-दत्तात्रयनगर (ता. आंबेगाव) येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखाना सुरु झाल्यामुळे कारखाना परिसरात ऊस तोडणी मजूर येथे दाखल झाले आहेत. त्यामुळे कारखाना परिसर मजुरांनी गजबजून गेला आहे. पारगाव येथील बाजारपेठेतही ऊसतोडणी मजुरांची खरेदीसाठी गर्दी होऊ लागली आहे.
कारखान्याचा गळीत हंगाम नुकताच सुरु झाला आहे. अनेक ठिकाणावरुन मजूर ऊस तोडणीसाठी बैलगाडी तर काही टॅक्टरच्या सहाय्याने ऊसवाहतूक करणारे उसतोडणी कामगार या ठिकाणी दाखल झाले आहेत. मागील वर्षी पाण्याचा तुटवडा असल्याने यावर्षी उसाचे क्षेत्र निम्म्याने घटले आहे.
त्यामुळे यंदा साखरेच्या उत्पादनात घट होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे यावर्षी साखर कारखाने यंदा उशिरा सुरु झाले आहेत. ऊसाअभावी साखर कारखाने लवकरच बंद होणार आहेत. यावर्षीचा ऊस तोडणीचा हंगाम अंदाजे तीन ते चार महिने चालणार आहे. येथील बाजारपेठही ऊस तोडणीच्या काळात गजबजलेली पहावयास मिळत आहे. कारखाना परिसरात वर्दळ वाढल्याने परिसर गजबजून गेला आहे.