भीमाशंकरला 20 गोणी प्लॅस्टिक कचरा संकलन

जुन्नरच्या श्री शिवछत्रपती महाविद्यालयाचा पर्यावरणदिनी उपक्रम

ओतूर – जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून श्री शिवछत्रपती महाविद्यालय, जुन्नर येथील प्राणिशास्त्र संशोधन केंद्राचे प्राध्यापक आणि विद्यार्थी यांनी भीमाशंकर अभयारण्यातील वीस गोणी प्लॅस्टिक कचरा गोळा करून पर्यावरण संवर्धन काळाची गरज असल्याचा संदेश समाजाला दिला.

प्लॅस्टिक कचऱ्यामुळे निसर्गाचे, पर्यायाने वसुंधरेचे कधीही भरून येणार नाही एवढे प्रचंड नुकसान होत आहे. ही बाब लक्षात घेऊन जुन्नर महाविद्यालयातील प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी प्लॅस्टिक कचरा गोळा करून त्याची योग्य विल्हेवाट लावण्याची मोहीम हाती घेतली. या मोहिमेमध्ये प्राणिशास्त्र विभागातील संशोधक डॉ. प्रमोद माने, प्रा. गौरव कांबळे, दीपाली माने, सिद्धेश मेहेर, अजित पानसरे, विशाल भगत, सुशील डहाळे, महेश मेहेर, अक्षय काबडी, उपेंद्र लोखंडे, लहान मुलांमध्ये प्रत्युष माने, सूर्यजा माने आणि अथर्व केंद्रे हे देखील सहभागी झाले होते.

या मोहिमध्ये भीमाशंकर येथील वन क्षेत्राधिकारी झगडे, डामसे आणि तुषार फाले यांनी स्थानिक पातळीवरील सर्व प्रकारची मदत केली. यावेळी प्रा. गौरव कांबळे यांनी सांगितले की, प्लॅस्टिकचा कमी वापर, पुनर्वापर, आणि पुनर्प्रक्रिया हे प्लॅस्टिक प्रदूषण कमी करण्यासाठी योग्य पर्याय ठरू शकतील आणि याचबरोबर याबाबतची जनजागृती देखील महत्त्वाची आहे. या मोहिमेसाठी संस्थाध्यक्ष ऍड. संजय काळे, प्राचार्य डॉ. सी. आर. मंडलिक आणि प्राणीशास्त्र संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ. आर. डी. चौधरी यांनी मार्गदर्शन केले.

प्लॅस्टिकमध्ये बिस्फिनॉल ए आणि पॉलीथिलीन टेरेपॅथालेट अशा रसायनांचा वापर होत असतो. यांमुळे कर्करोग, दमा, चक्कर येणे असे विकार होऊन मानवी आरोग्य धोक्‍यात येऊ शकते. जलपरिसंस्था विस्कळीत होते आणि परिणामी जलचर प्राणी मरण पावतात, त्यामुळे पर्यावरण संवर्धन चळवळ उभी राहणे गरजेचे आहे.
– डॉ. प्रमोद माने, नॅनोकन, जैवपदार्थ आणि प्रदूषण नियंत्रणाचे अभ्यासक

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)