अक्षय चंदनशिवेच्या मारेकऱ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाईची मागणी
रेडा-अकलूज येथील अक्षय चंदनशिवे यांच्या खून प्रकरणी मारेकऱ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाई करुन जेरबंद करण्याच्या मागणीसाठी इंदापूर पोलीस स्टेशनवर शेकडो भीमसैनिक व विविध सामाजिक संघटनेच्यावतीने मंगळवारी (दि. 25) जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला होता.
अकलूज येथील अक्षय चंदनशिवे याच्यावर मागील काही दिवसांत सराटी (ता. इंदापूर) येथे प्राणघातक हल्ला करून खून करण्यात आला होता. सोलापूर जिल्ह्यातून हद्दपार केलेल्या अण्णा कोळेकर, तुषार काटे व अन्य साथीदारांनी केवळ कॉलेजमध्ये शिकत असणाऱ्या मित्रांबरोबर का फिरतोय या कारणावरून अक्षय चंदनशिवे याला ठार मारले. या घटनेची सीबीआय चौकशी झाली पाहिजे अशी मागणी यावेळी आंदोलनकर्त्यांनी केली. तर मोका अंतर्गत कार्यवाही तात्काळ पोलिसांनी करावी अशी ही आग्रही मागणी मोर्चातील महिला व पुरुषांनी केली. यावेळी पोलीस निरीक्षक मधुकर पवार यांनी भीमसैनिकांचे निवेदन स्वीकारले. मोर्चा शांततेच्या मार्गाने पडला. यावेळी इंदापूर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
- आरोपींना पोलीस संरक्षण कधीही देणार नाही. त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. त्यानुसार आरोपींवर योग्य कारवाई केली जाईल
–मधुकर पवार, पोलीस निरीक्षक.