खून करून मृतदेहाच्या पायाला दगड बांधून भीमा नदीत फेकले

सुरकुंडी गावाच्या हद्दीतील घटना : मृतदेह आढळल्याने एकच खळबळ

राजगुरूनगर- सुरकुंडी (ता. खेड) गावच्या हद्दीत वाळद ते सुरकुंडी रस्त्यावरील पायलट पुलाखाली भीमा नदीच्या पात्रात एका अज्ञात व्यक्‍तीचा खून करून त्याच्या पायाला दगड बांधून पुरावा नष्ट करण्याचा उद्देशाने फेकून देण्यात आले होते. या अज्ञात व्यक्‍तीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

खेड पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, वाळद सुरकुंडी रस्त्यावरील भिमानदीवरील पायलट पूलावरून एका अज्ञात व्यक्तीचा नायलॉनच्या दोरीने गळा आवळून खून करून त्याच्या अंगावरची कपडे काढून, पायाला सिमेंटच्या पोलचा तुकडा बांधून पाण्यात फेकून देण्याची घटना घडली आहे. रविवारी (दि. 17) सायंकाळच्या सुमारास नागरिकांना पाण्यात अज्ञात व्यक्‍तीचा मृतदेह तरंगत असताना दिसून आला. त्यानंतर त्यांनी सुरकुंडीचे पोलीस पाटील यांना संपर्क करून माहिती दिली.

पोलीस पाटील जयकुमार रावळ यांनी खेड पोलीस ठाण्यात माहिती दिली. खेड पोलीस व स्थानिकांच्या मदतीने सोमवारी (दि. 18) मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला. मृतदेह सडल्याने त्याची ओळख पटवणे पोलिसांपुढे आव्हान असून संबंधित मयत व्यक्‍तीच्या गळ्यात भगव्या मण्यांची माळ आहे. त्याआधारे पोलिसांचा तपास सुरू आहे. दरम्यान खेड पोलिसांनी अज्ञात व्यक्तीच्या खूनप्रकरणी अज्ञात व्यक्‍ती विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास खेड पोलीस ठाण्याचे निरीक्षक अरविंद चौधरी करीत आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here